Wednesday 19 October 2011

सारखं छातीत दुखतंय!

आपला भारत देश महान देश आहे ! सुजलाम्‌-सुफलाम्‌ देश म्हणूनही या देशाची महती सांगितली जाते. तसंच या देशाची राज्यघटना ही जगातील अग्रक्रमाची राज्यघटना म्हणूनही मान्यता प्राप्त आहे. लोकशाहीच्या महत्त्वपूर्ण मुल्यावर या देशाची दारोमदार तोललेली आहे. आपल्या घटनेत एक मुद्दा प्रामुख्याने नमूद करण्यात आलाय. तो म्हणजे, कायद्याचं रक्षण करताना भलेही शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील; पण एकाही निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये! खरं तर हा मुद्दा नसून या देशातील कायदा- सुव्यवस्थेचं ते एक तत्त्व आहे. लोकशाही तत्वप्रणालीमुळे या देशाने जगभरातील देशांमध्ये सर्वोच्च स्थान मिळवलंय, यातही काहीच दुमत नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून भारत देशाविषयीचं हे चित्र बदलत चाललंय. अर्थातच या बदलत्या चित्राला इथला सामान्य माणूस जबाबदार नसून या देशाचे राज्यकर्तेच जबाबदार आहेत.

आज देशाचा एकही कोपरा असा उरलेला नाहीय, जिथे घोटाळा झालेला नाहीय. उन्हाळा-पावसाळ्याचे जसे दिवस येतात.अगदी तसेच आता घोटाळ्यांचे दिवस आलेत, असं म्हणण्याची वेळ आताच्या राजकारण्यांनी आपल्यावर आणलीय. जमीन घोटाळ्यापासून खेळातील घोटाळ्यापर्यंत इथल्या भ्रष्ट मंत्र्यांनी आणि राजकारण्यांनी मजल मारलीय. विशेष म्हणजे हे घोटाळे केवळ सत्ताधारीच करताहेत असं अजिबात नाहीय. तर विरोधी पक्षाच्या बाकावर बसणारेही असेच घोटाळेबाज निघालेत. कोणी टेलिकॉम क्षेत्रात घोटाळा करतोय. तर कुणी जवानांच्या घरांचा घोटाळा करतोय. कुणी राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेसाठी मागवण्यात आलेल्या सामानातील मलई खाताना पकडला गेलाय. इतकंच नाही तर देशातील रस्ते सुद्धा या घोटाळेबाजांनी सोडलेले नाहीत. देशाच्या नागरिकांकडून कर वसूल करायचा आणि त्यांना खड्डेयुक्त रस्त्यांवरून प्रवास करण्यास भाग पाडायचं! अशी आजची परिस्थिती आहे. देशाची भ्रष्टाचाराविषयक परिस्थिती आता इतकी चिघळलीय की, सामान्य माणुसही आता राजकारण्यांचा शाब्दिक "उद्धार' करण्यास मागे पुढे पाहत नाहीय. अशा परिस्थितीत या भ्रष्ट मंत्र्यांचं किंवा राजकारण्यांचं करायचं काय, असा मोठा प्रश्न देशाच्या प्रत्येक संवेदनशील माणसाला पडलाय. याचं कारण असंकी, एखादा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सर्वोच्च तपास यंत्रणा रात्रंदिवस एक करून त्या घोटाळ्यात अडकलेल्यांना अटक करतात. न्यायालयीन कारवाई पूर्ण करून त्या सर्व घोटाळेबाजांना गजाआड टाकतात. पण त्याच रात्री या घोटाळेबाजांच्या छातीत कळा यायला लागतात आणि त्यांची रवानगी पंचतारांकित रुग्णालयात केली जाते. न्यायालयाने फर्मावलेली पोलीस वा न्यायालयीन कोठडीची मुदत जोवर संपत नाही तोवर या घोटाळेबाजांच्या छातीतील कळा काही थांबत नाहीत....

आज देशाच्या विविध कारागृहात कॉंग्रेससह भाजप आणि अन्य महत्त्वाच्या राजकीय पक्षांची बडी धेंडं विविध घोटाळ्यांच्या प्रकरणात डांबण्यात आलेली आहेत. यात आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचीही भर पडलीय. येडियुरप्पा यांच्यावर मुख्यमंत्रीपदाला असलेल्या अमर्याद अधिकारांचा वापर करत सहकारी मंत्र्यांच्या सहाय्याने सरकारी जमिनींवरील आरक्षण उठवून त्या जमिनी आप्तस्वकियांना देऊ केल्याचा खटला भरण्यात आलाय. हा खटला कर्नाटकच्या लोकायुक्त न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाने या प्रकरणी येडियुरप्पा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे येडियुरप्पा यांना सेंट्रल जेलमध्ये आणण्यात आलं. मात्र त्याच रात्रीउशीरा अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि त्यांना उलट्यांचाही त्रास होऊ लागला. मग काय जेलप्रशासनाने तातडीने येडियुरप्पा यांना रातोरात नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. आता येडियुरप्पा पुढचे सातही दिवस याच रुग्णालयात काढतील. तोपर्यंत त्यांचे हितचिंतक कोर्टात त्यांच्या जामिनाची सोय करतील. यानंतर येडियुरप्पांना जामीन मंजूर होईल. ते बाहेर येतील आणि ज्या घोटाळ्यात त्यांना अटक करण्यात आली होती त्या घोटाळाप्रकरणाचा खटला "तारीख पे तारीख' या न्यायाने पुढे अनेक वर्षं सुरू राहिल.

ए. राजाला अटक केल्यानंतर त्याच्या सुद्धा असंच छातीत दुखलं होतं...! इतका मोठा घोटाळा केल्यानंतर कोणाच्याही छातीत कळा येणार. पण या स्वाभाविक कारणाचा गैरफायदा हे घोटाळेबाज घेताहेत हे अजूनही कोणाच्या लक्षात येत नाहीय.  "सारखं छातीत दुखण्याची' ही प्रथा गेले काही वर्षं राजरोसपणे आपल्याकडे राबवली जातेय. राजकारण्यांना तर या प्रथेची इतकी सवय झालीय की ते एखाद्या घोटाळ्याच्या प्रकरणात कोर्टात हजर राहण्यासाठीही "सारखं छातीत दुखतंय...'चं कारण सांगतात. या देशाची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखायची असेल तर अशा घोटाळेबाजांच्या छातीतील कळांवर तातडीने उपचार करणं गरजेचं आहे. याच बरोबर त्यांना कारागृहात मिळणाऱ्या पंचातारांकित सुविधांवरही गाज आणली पाहिजे. अन्यथा घोटाळा केल्यानंतर किंवा भ्रष्टाचार केल्यामुळे तुरुंगात जावं लागेल याची भीतीच त्यांना उरणार नाही. ढोबळ अर्थाने कारागृहं ही आरोपींना सुधरवण्यासाठी तयार करण्यात आलेली आहेत. मात्र अशा व्हिआयपी पाहुण्यांना जी वागणूक कारागृहातून दिली जाते त्यावरून तरी आपली कारागृहं कोणत्याही पंचातारांकित हॉटेलांपेक्षा कमी नाहीत, असं वाटू लागलंय.

भ्रष्टाचारातील किंवा घोटाळ्यातील संशयिताला कोर्टाने सुनावलेल्या कोठडीच्या मुदतीतून सुटका करून घेण्याचा हा सुकर मार्ग आता बंद करायला हवा. अन्यथा हे घोटाळेबाज असेच घोटाळे करत राहतील आणि अटक केल्यानंतर निवांतपणे कारागृहात बसण्याऐवजी रुग्णालयात रवाना होत राहतील. ज्यामुळे कोणालाच कायद्याचा वचक राहणार नाही.

                                                                                                                                  राकेश शिर्के (सांध्य)

Wednesday 12 October 2011

गझल मुकी झाली!

मुलायम गळ्याचा आणि नाजूक हृदयाचा गझल गायक म्हणून ज्यांची ओळख आहे ते जगजीत सिंग आपल्यातून निघून गेले. आमच्या कार्यालयात कदाचित मी एकमेव पत्रकार असा आहे, ज्याच्यावर नेहमीच अशा मोठ्या लोकांच्या निधनाची बातमी करण्याची जबाबदारी सोपवली जाते. पण या वेळी मात्र थोडी वेगळी परिस्थिती होती. कारण जगजीत सिंग यांच्या केवळ निधनाचीच मला बातमी करायची नव्हती तर त्यांच्या निधनावर अग्रलेखही लिहावा लागला होता. ही दोन्ही कामं माझ्यासाठी कठीणच होती. मात्र नोकरीत किंवा पत्रकारितेत तुमच्याकडे फारच कमी पर्याय असतात. यामुळेच हा अग्रलेख लिहिण्याची जबाबदारी मी पार पाडली. काळजावर दगड ठेऊन.....

चिठी ना कोई संदेस, जाने वो कौनसा देस जहाँ तुम चले गये...
गझलांच्या प्रांतातील बादशाह म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या गुलाम अली साहेबांनी गझल म्हणजे काय? हे एकदा एका मुलाखतीत सांगितलं होतं. खरं तर तीच गुलाम अलींनी "गझल'ची सांगितलेली खरीखुरी व्याख्या होय. ते म्हणाले होते, "शिकारी जेव्हा एका गोेंडस हरणाचा पाठलाग करतो आणि अचूक नेम साधून त्याच्या कंठाचा वेध घेतो. तेव्हा ते हरीण खाली कोसळतं. त्याच्या कंठातून भळाभळा रक्त वाहू लागतं आणि काही काळाने त्या जखमी हरणाच्या कंठातून शेवटची "आह' बाहेर पडते. ती शेवटची "आह' म्हणजे गझल... गझल इतकी नाजूक आहे आणि म्हणूनच गझल गाणं इतक सोपं नाहीय...' खरंच म्हणाले होते गुलाम अलीसाहेब. गझल गाणं खरोखरच सोपं काम नाहीय. पण असं हे अवघड काम अगदी सहजतेने "तो' किती तरी वर्षं करत होता. "गझलांचा बादशाह' जगजीत सिंग.... काल सकाळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आणि क्षणातच "गझल' मुकी झाली...

"गझल' म्हटलं की ती उर्दू भाषेचीच, असा एक समज गेली अनेक वर्षं गझलांच्या प्रांतात बिनदिक्कत वावरत होता. पण जेव्हा जगजीत सिंग गझल गाऊ लागले; जगू लागले, तेव्हा त्यांनी "गझल' केवळ उर्दूची नाही तर ती हिंदीची सुद्धा आहे, हे दाखवून दिलं. गझल म्हणजे दु:ख, असंही काहींचं म्हणणं होतं. पण हेही म्हणणं जगजीत सिंगांनी चुकीचं ठरवलं. "तुम को देखा तो ये खयाल आया, जिंदगी धूप तुम घना साया...' या शब्दांना त्यांनी सुरेल, मुलायम चालीत गायलं आणि गझलविषयीचं प्रचलित मत बदलवून टाकलं. खरं तर ज्या काळात जगजीतजींनी गझल गायला सुरुवात केली होती तो काळ मेहंदी हसन आणि गुलाम अली यांच्या जादूई आवाजाचा काळ होता. "गझल' गाणं जणू या दोनच गझल गायकांचा अधिकार आहे, असंच साऱ्यांचं मत होतं. मात्र जेव्हा जगजीत सिंगांनी गझलांच्या प्रांतातील आपली मुशाफिरी सुरू केली, तेव्हा भारतीय गझल रसिक सुखावून गेले. पण तेव्हा जगजीत थोडे खट्टू झाले होते. त्यांचं म्हणणं होतं, गझलांवर जशी कोणाचीच मालकी असू शकत नाही. तसंच माझ्या गाण्याने या दोन्ही दिग्गज गझलकारांचं महत्त्व कमी झालंय, असं अजिबात समजू नका. कारण जो गझलकार गझल जगतो, तो कायमच गझलांचा स्वामी असतो. म्हणूनच मेहंदी हसनसाब आणि गुलाम अली हे दोघंही गझलांचे स्वामी आहेत; जितका मी आहे. इतकी नम्रता या गझलांच्या बादशाहात होती!

जगजीत सिंग यांनी गझलांच्या दुनियेत क्रांती केली होती. सिनेमांची गाणी न गाताही मोठा गायक होता येतं, हे त्यांनी जगाला दाखवून दिलं. अर्थातच यात त्यांना त्यांची पत्नी चित्रा सिंग यांची मोठी साथ मिळाली होती. या दाम्पत्याने बिगर सिनेगीतं गाऊन गीतांच्या दुनियेत विक्रम नोंदवला. या दोघांनी अनेक गझलांच्या मैफली जिवंत केल्या. पण नियतीला कदाचित हे मान्य नव्हतं. एका मोटार अपघातात त्यांचा तरुण मुलगा विवेक मरण पावला. या धक्क्यातून जगजीतजी आणि चित्रा सिंग यांना सावरणं केवळ अशक्य होतं. जगजीत सिंग यांनी स्वत:ला सांभाळलं आणि ते पुन्हा गझलेच्या सेवेत रुजू झाले. पण चित्रा सिंग यांनी गाणं बंद केलं. गझल तेव्हा पोरकी झाली होती! जगजीत सिंग मुलाच्या मृत्यूचं दु:ख गझल गाऊन लपवण्याचा प्रयत्न करत होते. "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छिपा रहे हो...' असं सतत गझल रसिकांना तेव्हा त्यांना विचारावंसं वाटत होतं. मोठ्या मुश्किलीने जगजीतजींनी या धक्क्यातून स्वत:ला सावरलं होतं.

जगजीत सिंग यांनी सिनेमांसाठी गाणी गायली नाहीत, असं नाही. अनेक सिनेगीतांना त्यांनी वेगळी ओळख मिळवून दिली होती. याचं मोठं उदाहरण म्हणजे, "होठों से छूलो तुम...' ही गझल. ही गझल सिनेमात ज्या चालीवर गाण्यात आली त्याहून तब्बल आठ वेगवेगळ्या चालींत ते हीच गझल मैफलीत गाऊन दाखवत. विशेष म्हणजे सिनेमातील गझलेइतकीच त्या आठही चालींतील गझल रसिकांच्या पसंतीस उतरली होती. सिनेमात इतक्या कमी गझल का गायल्यात, या प्रश्नाचं उत्तर ते अगदी मजेशीर द्यायचे. ते म्हणायचे, "मला सिनेमात गझल गाण्यासाठी कुणी चान्सच देत नाही.' एकदा हेच उत्तर देताना त्यांच्या शेजारी साक्षात गानकोकिळा लता मंगेशकर उभ्या होत्या. त्या तेव्हा गोड हसल्या होत्या. पण काल जगजीत सिंगांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना त्याच लता मंगेशकर म्हणाल्या, "मला जगजीत सिंग यांच्यासोबत गझल गायला मिळाली ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे.' लता मंगेशकरांची ही प्रतिक्रिया जगजीतजींचं केवळ श्रेष्ठत्व सिद्ध करत नाही तर काल आपल्या सर्वांची किती मोठी हानी झालीय, याचीही जाणीव करून देते.

असा हा गझलांचा बादशहा केवळ गझल गायकच नव्हता. तर ते एक संवेदनशील माणूसही होते. समाजाशी असलेली बांधिलकी त्यांनी कायम राखली. समाजसेवेचं व्रत आयुष्यभर सांभाळणारा गझल नवाज म्हणूनही जगजीतजींना सारे जण ओळखत होते. याचा प्रत्यय त्यांनी गायलेल्या "ना मैं हिंदू, ना मैं मुसलमान, मुझे जीने दो... दोस्ती मेरा इमान, मुझे जीने दो...' या गीतातून येतो. याचा आणखी एक पुरावा द्यायचा झालाच तर महाराष्ट्र राज्याचा देता येईल. राजस्थानात पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या जगजीत सिंग यांना "पद्मभूषण' हा भारत सरकारचा मानाचा किताब द्यावा, अशी शिफारस महाराष्ट्र राज्याने केली होती आणि त्याप्रमाणे हा किताब जगजीतजींना बहालही करण्यात आला होता. म्हणूनच ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी "पद्मभूषण जगजीत सिंग' यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आजही इंडस्ट्रीत जगजीत सिंग यांच्याबद्दल असंच म्हटलं जातं की, गझलमुळे गायक मोठे होतात, पण जगजीत सिंगांनी गायलेल्या गझलांमुळे गझल मोठी झाली!

शबाना आझमी यांची ही प्रतिक्रिया वरकरणी वेगळी वाटत असली तरी ती चुकीची नक्कीच नाही. कारण या देशात गझलांच्या प्रांतात जगजीत सिंग यांनी केलेली क्रांती कोणीही नाकारू शकत नाही. जगजीत सिंग यांच्यासारख्या कलावंताचं आपल्यातून जाणं मोठं दु:खद आहे. ये दौलत भी ले लो, ये शौरत भी ले लो, भले छिन लो मुझसे मेरी जवानी....' किंवा मग "शामसे आँखो में नमी सी है, आज फिर आपकी कमी सी है' असं जगजीतजींच्या जाण्यामुळे म्हणण्याची वेळ नियतीने आपल्यावर आणलीय. त्यांच्या जाण्याने गझल मुकी झालीय...! तिथे आपली काय बात...?
                   
                                                                                                                             - राकेश शिर्के (सांध्य)