Friday 19 August 2011

एका 'ब्लफमास्टर'चे दोन भन्नाट किस्से


- त्याने बायकोच्या भांगेत कुंकूऐवजी लिपस्टिक भरली!

- त्याला नर्गिसने किस करण्याचं वचन दिलं होतं! 


         हिंदी सिनेमाचा 'जंगली' कलाकार काळाच्या पडद्याआड गेलाय. रुपेरी पडदा फिक्का पडलाय; पण येणं आणि जाणं हे निसर्गचक्र आहे. जे प्रत्येकाच्या वाट्याला आलंय. म्हणून माणसाचं जगात येणं आणि त्याचं जगातून निघून जाणं याचा शोक करत बसण्यापेक्षा त्याच्या आठवणींना सतत उजाळा देण्याचा प्रयत्न करणंच योग्य ठरेल. आठवणींच्या मदतीने आपल्या लाडक्या, आवडत्या व्यक्तिंना याद करणं, त्याच्या जाण्याची आठवण विसरायला मदतगार ठरतं. अगदीच हेच शम्मी कपूर यांच्याबाबतीत करणं उचित आहे. त्यांच्या आठवणी इतक्या आहेत की, त्या आयुष्यभर पुरतील. दररोज एक आठवण या प्रमाणात जरी आपण शम्मीजींना याद केलं तरी आयुष्य त्यांच्या आठवणीत कधी सरून जाईल, ते कळायचं सुद्धा नाही. म्हणून त्यांच्या आयुष्यातील या दोन भन्नाट आठवणी... कदाचित हीच त्यांना वाहिलेली आदरांजली...!

शमशेर राज कपूर उर्फ शम्मी कपूर यांनी हिंदी सिनेसृष्टीचा पन्नास ते सत्तरचा काळ गाजवला. नव्हे, आपला ठसा उमटवला. या काळावर राज कपूर, दिलीप कुमार आणि देवानंद यांचं अधिराज्य होतं. पण शम्मीजींनी या तिघांशी कधीच स्पर्धा केली नाही तर आपल्या अभिनयाच्या आणि 'याहू' अदाकारीने रुपेरी पडद्यावर आपलं नाव कोरलं. तर, शम्मीजींच्या लग्नाचा एक भन्नाट किस्सा आहे. तो काळ होता 1955चा. या काळात प्रेमविवाह हा विषय केवळ सिनेमा पुरताच मर्यादित होता. अशा काळात शम्मीजींचं आघाडीची अभिनेत्री गीता बाली हिच्यावर प्रेम जडलं. शम्मीजी तेव्हा अवघे तेवीस वर्षांचे होते तर गीता बालीचं वय होतं चोवीस... प्रेम चांगलंच बहरलं... बात अगदी लग्नापर्यंत जाऊन पोचली. पण ठाऊक होतं घरातून लग्नाला परवानगी तर मिळणारच नाही उलट अडचणी आणखी वाढतील. म्हणून मग शम्मीजींनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. अर्थात या निर्णयात गीता बाली त्यांच्यासोबत होत्याच. आपला सर्वात जवळचा मित्र वाडीया याला घेऊन शम्मीजी आणि गीता बाली दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बाणगंगा मंदिरात पोचले. कारण की पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय या दोघांनी अतिशय तडकाफडकी घेतला होता म्हणून मग वेळेचं बंधन त्यांना पाळणं अशक्य होतं. हे प्रेमीयुगुल जेव्हा बाणगंगा मंदिरात पोचले तेव्हा रात्रीचे साडेअकरा वाजले होते. मंदिराच्या पुजाऱ्याने सांगितलं, 'आता मी तुमचं लग्न लावू शकत नाही. कारण देव झोपलाय.' हे ऐकल्यावर शम्मीजींची अवस्था अतिशय केविलवाणी झाली होती. अगदी सहजच त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, "उफ्‌ इस भगवान को भी अभी सोना था?' आता काय करायचं? या विवंचनेत शम्मीजी, गीता बाली आणि त्यांचा मित्र वाडीया माघारी फिरले. आता कुठे जायचं? घरी गेलो तर खैर नाही... म्हणून मग दोघंही माटुंग्याच्या एका हॉटेलात येऊन थांबले. रात्र वैरीण बनली होती. सोबत प्रेम असतानाही शम्मीजींच्या जीवाची नुसती तगमग होत होती. अखेर घडाळ्याच्या काट्याने रात्रीचे चार ओलांडले. तसे हे दोन प्रेमीजीव पुन्हा एकदा बाणगंगा मंदिरात दाखल झाले. पुजाऱ्यानेही देव झोपून उठल्याचं सांगत दोघांचं लग्न लावून दिलं. आणि अचानक लक्षात आलं सौभाग्याचं लेणं म्हणून गीता बालीच्या भांगेत भरण्यासाठी कुंकूच सोबत आणलं नाहीय. आजवर सिनेमातून "मांग भरण्याची' पाहिलेली दृश्य सटासट शम्मीजींच्या डोळ्यांसमोरून सरकत गेली. तेवढ्यात गीता बालीने कधीच आणि कोणीच कल्पना करू शकणार नाही अशी कृती केली. लगबगीने स्वत:च्या पर्समधून लिपस्टिक बाहेर काढली आणि शम्मीजींच्या हातात देऊन म्हणाली, 'लो इससे भरो मेरी मांग...' शम्मीजी क्षणभर त्यांच्या लाडक्या प्रियतमेकडे पाहत राहिले आणि कळत नकळतच त्यांनी गीता बालीच्या भांगेत लिपस्टिक भरली. (खरं तर लिपस्टिक लावली, असं म्हटलं पाहिजे.)
शम्मी कपूरजींचा हा किस्सा त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि आवडता किस्सा आहे. याची कबुली त्यांनी स्वत:च दिलीय.

शम्मीजी नर्गिसचे मोठे चाहते होते. एकदा तरी नर्गिसला भेटावं, तिला डोळे भरून पहावं, तिला सांगावं मी तुझा मोठा फॅन आहे, असं शम्मीजींना सतत वाटत होतं. अचानक एकेदिवशी त्यांना कळलं की, नर्गिस आर. के. स्टुडीओत आलीय. नर्गिसला पाहण्याची ही संधी अजिबात वाया जाऊ द्यायची नाही, असा विचार करून स्वारी चेंबूरच्या आर. के. स्टुडिओत पोचली. हा किस्सा आहे शम्मीजी अवघे सतरा वर्षांचे असतानाचा... मोठा भाऊ, राज कपूर याचा दरारा माहीत असूनही आणि त्यांना कामात कोणीही अडथळा आणलेला खपत नाही हे ठाऊक असतानाही शम्मीजी काहीसे घाबरतच स्टुडिओत पोचले. त्यांची नजर सेटवर केवळ एकाच व्यक्तिचा शोध घेत होती. नर्गिसचा.... पण ती कुठेच दिसेना. एवढ्यात कुणी तरी सांगितलं नर्गिसजी त्यांच्या खोलीत आहेत. शम्मीजी आनंदीत झाले. नर्गिसला खोलीत भेटणं केव्हाही सुरक्षित आहे, असा विचार करून त्यांची पावलं नर्गिसच्या खोलीकडे सरकली. थोडंसं बिचकतच शम्मीजींनी नर्गिसच्या खोलीचं दार ढकललं. तेव्हा आतील दृश्य पाहून शम्मीजींच्या काळजात चर्रर झालं. नर्गिस खोलीत बसून रडत होती. शम्मीजींना क्षणभर काय करावं काहीच सूचत नव्हतं. कशासाठी आलो होतो आणि काय समोर दिसतंय? याच तंद्रीत असताना नर्गिसची नजर शम्मीजींवर पडली. नर्गिसने त्यांना ओळखलं. डोळे पुसतच विचारलं, 'काय काम आहे?' नर्गिसचे शब्द जणू मधाचा प्रत्येक थेंब वाटावा, अशा अविर्भावात त्यांनी ते कानात साठवून घेतले. आपण कशासाठी आलो आहोत, हे नर्गिसला सांगण्याऐवजी तिच्या रडण्याचं कारण त्यांनी विचारलं. यावर नर्गिस म्हणाली, 'मला तुझ्या भावाच्या सिनेमात काम करायचंय. पण तो नाही म्हणतोय.' राज कपूर आपला मोठा भाऊ असला तरी त्याला त्याच्या कामात कोणाचीच ढवळाढवळ खपत नाही हे शम्मीजींना पुरतं ठाऊक होतं. याही पेक्षा राज कपूरांना वशिल्याची आणि वशिलेबाजांची नफरत आहे, हे तर शम्मीजींना पक्क ठाऊक होतं. काय करावं? काहीच कळत नव्हतं. तेव्हा शम्मीजी स्वत:चा धीर एकवटून आपल्या लाडक्या अभिनेत्री, नर्गिसला म्हणाले, 'मी तुझ्यासाठी प्रार्थना करीन...' शम्मीजींचं हे उत्तर ऐकून नर्गिस अतिशय भावूक झाली. तिने लागलीच शम्मीजींना घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, 'जर मला तुझ्या भावाने त्याच्या 'बरसात' या चित्रपटात घेतलं तर मी तुला एक किस देईन...' नर्गिसचे हे शब्द कानावर पडल्यानंतर शम्मीजी केवळ बेहोष होऊन खाली कोसळायचेच बाकी होते; पण असं होणार नव्हतं. कारण ते नर्गिसच्या मिठीत होते. पुढे नर्गिसला 'बरसात' मिळाला. राज-नर्गिस ही जोडी रुपेरी पडद्यावर हिट झाली! पण नर्गिसने शम्मीजींना दिलेलं वचन पाळलं की नाही याबाबत शम्मीजींनी कधीच कुणाला उघडपणे सांगितलं नाही. ते केवळ एवढंच सांगत, 'नर्गिसने मला किस करण्याचं वचन दिलं होतं...'
नंतर याच 'जंगली' अभिनेत्याने 'किस, किस को प्यार करूँ...' या गाण्यावर ताल धरला!  
  - राकेश शिर्के (सांध्य)

No comments:

Post a Comment