Thursday 8 September 2011

डॉ. विनायक सेन आणि उंदीर


ही दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. डॉ. विनायक सेन दोन वर्षांनंतर जेलमधून सुटून आले होते. त्यांच्यावर नक्षलवाद्यांचं समर्थन करण्याचा आरोप लावण्यात आला होता. आणि ते देशद्रोही आहेत असा ठपकाही छत्तीसगड सरकारने त्यांच्यावर ठेवला होता. त्यांच्या सुटकेसाठी जगभर आंदोलन छेडण्यात आलं होतं. या आंदोलनात "महानगर'नेही महत्त्वाची भूमिका बजावली होती. याची माहिती मिळाल्यानंतर डॉ. विनायक सेन "महानगर'च्या कार्यालयाला भेट देण्यासाठी आले होते... तेव्हाची ही गोष्ट आहे...

मुंबईत गाडी पार्किंगसाठी जागा मिळणं तितकंच मुश्किल आहे जितकं विनागर्दीच्या रस्त्यावरून चालायला मिळणं. गाडी पार्क करण्यासाठी जागा शोधत शोधत डॉ. सेन यांची गाडी "महानगर'च्या कार्यालयापासून पुढे काही अंतरावर जाऊन थांबली. त्या वेळी त्यांना कार्यालयात आणण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. कारण या भेटीदरम्यान मीच त्यांची मुलाखतही घेणार होतो. इतक्या मोठ्या व्यक्तिला आपण रिसिव्ह करायला जातोय, याचं दडपणही होतं आणि उत्सुकताही. मी डॉ. विनायक सेन यांच्या गाडीजवळ पोचलो. ते खाली उतरले आणि आम्ही कार्यालयाच्या दिशेने चालू लागलो. माझं डॉ. सेनना निरखण्याचं काम अद्याप सुरूच होतं. मध्येच ते काही माहिती विचारत. तर कधी एखादा प्रश्न... मी  त्यांचं शंकानिरसन करत पुढे चालत होतो. डॉ. विनायक सेन इतक्या हळू आवाजात बोलतात की त्यांच्या आवाजावरून ते किती मितभाषी आणि शांत स्वभावाचे आहेत याची मला कल्पना येत होती. मात्र तेव्हाच एक प्रश्न मला पडला. अशा स्वभावाचा हा माणूस नक्षलवाद्यांचा समर्थक कसा काय? हे देशद्रोही कसे काय? अखेर आम्ही कार्यालयापर्यंत येऊन पोचलो. तेव्हाच कार्यालायाच्या खालच्या बाजूला असलेल्या एका दुकानाजवळ डॉ. सेन थबकले. तसा मीही थांबलो. क्षणभर ते का थांबले आणि त्या दुकानात ते काय पाहताहेत? कशाचाच उलगडा होईना. म्हणून मग मीच विचारलं, काय झालं सर? का थांबलात? यावर डॉ. सेन पहिल्यांदा केवळ हसले आणि त्यानंतर त्यांनी जे उत्तर दिलं त्या उत्तराचा आज म्हणजे दोन वर्षांनी मला अर्थही कळला आणि उलगडाही झाला. डॉ. सेन म्हणाले, वो चुहॉं देख रहे हो राकेश? मी म्हणालो, हॉं सर, मुंबई में चुहोंकी कमी नही. बीएमसीने उन्हे पकडने के लिए इनामभी रखा है। यावर ते पुन्हा हसले आणि म्हणाले, नहीं सिर्फ इतनाही सच नही। वो चुहॉं उस दुकान में फस गया है। उसे वहॉं से बाहर निकलना है। और इसीलिए वो बाहर निकलनेकी कोशिश कर रहा है। डॉ. सेन यांच्या या उत्तरामुळे मी बुचकळ्यात पडलो. आणि स्वत:शीच पुटपुटलो, अहो डॉक्टर, त्या दुकानदाराला कळलं की, त्याच्या दुकानात उंदीर शिरलाय. तर तो स्वत:च त्याला दुकानाबाहेर फेकून देईल किंवा त्याचा खातमा तरी करील... अर्थातच माझ्या या स्वगताला त्या वेळी काहीच अर्थ नव्हता. पण आता त्या साऱ्या प्रसंगाचा उलगडा झालाय. डॉ. सेनना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. ते आता तुरुंगातून बाहेर आलेत. तब्बल दोन वर्षांनी...

आपल्याकडे उंदराला निरूपद्रवी समजलं जातं. पण दुसरीकडे त्याच उंदराने सिंहाची जाळ्यातून सुटका केल्याची गोष्टही सांगितली जाते. याचाच अर्थ उंदीर मुलत: कमजोर नाही, निरूपद्रवी तर बिल्कुल नाही. यामुळे उंदराला कमी लेखण्याचीही काहीच गरज नाही. डॉ. विनायक सेन आणि उंदराचा तो किस्सा ज्या काळात घडला. त्या काळाचा विचार करता डॉ. सेन आणि त्या उंदराची धडपड सारखीच होती. सुटण्याची... आणि म्हणूनच सुटकेचं महत्त्वही हे दोघंच जाणू शकतात.

असो... आज डॉ. विनायक सेन जामिनावर मुक्त झालेत. पण त्यांच्या समोरील आव्हानं मात्र अद्याप कायम आहेत. डॉ. सेन यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने छत्तीसगड सरकारच्या कानाखाली काढलेला आवाज इथे महाराष्ट्रातही अद्याप घुमतोय. डॉ. सेनना जामीन देताना सर्वोच्च न्यायालय म्हणालंय की, केवळ नक्षलवाद्यांचं समर्थन केल्याने डॉ. विनायक सेन देशद्रोही ठरू शकत नाही. या वेळी न्यायालयाने खूपच महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकलाय. त्यांच्या मते, एखाद्याच्या घरात गांधींचं आत्मचरित्र सापडलं तर त्यावरून ती व्यक्ती गांधीवादी ठरू शकत नाही! सर्वोच्च न्यायालयाच्या या म्हणण्याच अन्वयार्थ लावणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आज देशात अशाच प्रकारे दडपशाही राबवली जात आहे. नक्षलवादावरील साहित्य बाळगल्याप्रकरणी कैक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. महाराष्ट्रात तर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अशांवर कडक कारवाई करण्याचे आदेशच दिले आहेत. याच आदेशाचा बळी ठरलेत ते "विद्रोही' मासिकाचे संपादक सुधीर ढवळे. त्यांनाही गडचिरोली भागात पोलिसांनी अटक केलीय. अर्थातच त्यांना नक्षलवादी ठरवण्यासाठीच ताब्यात घेण्यात आलंय. ढवळेंना अटक करताना त्यांच्याकडेही असंच तत्सम साहित्य सापडल्याची बोंब पोलिसांनी मारली. पण ठोस पुरावे काही पोलिसांना सापडले नाहीत. आता चौकशीच्या नावाखाली पोलीस ढवळेंना मानसिक (कदाचित शारीरिक त्रासही) देताहेत. त्यांच्या कुटुंबिंयानाही याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. पोलिसांनी ढवळेंच्या घराची झडती घेताना दाखवलेला पराक्रमच त्यांच्या हेतूची पुष्टी देतोय. सुधीर ढवळे यांच्या पत्नीच्या परवानगीशिवाय पोलिसांनी ढवळेंच्या घराची झडती घेतली. त्यांच्यावर सही करण्यासाठी दबाव टाकत जप्त केलेलं सामान/साहित्य सीलबंद करण्यात आलंय. ही शासनाची दडपशाहीच आहे. आता डॉ. सेन यांच्याप्रमाणेच सुधीर ढवळेंच्या सुटकेसाठीही जनआंदोलन उभं केलं जातंय. मात्र या आंदोलनात सहभागी होताना सामान्य नागरीक प्रचंड घाबरलेला आहे. कारण त्यांच्या खिशातही ढवळेंच्या अटकेसाठी काढण्यात आलेलं निवेदन सापडलं तर पोलीस हमखास त्यांनाही नक्षलवादी ठरवतील, अशी भीती त्या सामान्य नागरीकांना वाटतेय.

डॉ. विनायक सेन, हिमांशू कुमार, अरुंधती रॉय, सुधीर ढवळे ही सारी मंडळी स्वत:ची एक भूमिका घेऊन मानवी हक्काची लढाई लढताहेत. अशा वेळी त्यांना देशद्रोही ठरवून आणि त्यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावून शासन स्वत:चं अपयश झाकू शकत नाही. कारण जनआंदोलन जेव्हा उग्र स्वरूप धारण करतं तेव्हा काय घडतं याचा अनुभव शासनाला आहे. म्हणून मानवी हक्काच्या आंदोलकांवर कारवाई करून त्यांची अडवणूक करण्यापेक्षा असं आंदोलन करण्याची वेळच येणार नाही, याची काळजी घेणं अधिक उत्तम. हे शासनानं जाणून घेणं गरजेचं आहे.


- राकेश शिर्के (सांध्य)

1 comment:

  1. समोरच्याच्या वेदनेची संवेदना होण इतक जर सोप असत
    तर या जगात कधीच कुणी दुखी नसत ........
    समोरच्याच्या वेदनेची संवेदना होण हीच माणुसकीची अस्मिता
    आणि तीच खरी मात्र खरी पत्रकारिता ...........

    सांध्य वाचक / शुभेच्छुक - अनुराधा नलावडे .

    ReplyDelete