तो आठवडा विविध घटनांनी गच्च भरलेला होता. एका पेक्षा एक घटना त्या आठवड्यात घडल्या. त्या घडलेल्या घटनांचं विशेष म्हणजे या साऱ्याच घटना सामाजिकतेशी संबंध सांगणाऱ्या होत्या. म्हणजे त्या घटनांचे बरे-वाईट परिणाम इथल्या एकूण सामाजिक परिस्थितीवर झाले. "आदर्श' घोटाळ्याचा पाठपुरावा करणाऱ्या घटनांचाही यात समावेश होता. सर्वात मोठी घटना या आठवड्यात घडली ती म्हणजे, अण्णांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेलं उपोषण आणि त्या उपोषणाला मिळालेलं नव्या सामाजिक क्रांतीचं यश! पण खऱ्या अर्थाने जर त्या आठवड्यात सामाजिकदृष्ट्या घडलेल्या घटनांचा तपशील मिळवण्याचा प्रयत्न करायचा झाला तर प्रामुख्याने तीन घटना समोर येतात. या तिन्ही घटनांनी इथली सामाजिक सद्यपरिस्थिती ढवळून काढली होती. यातील पहिली घटना होती, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना मिळालेलं 50 टक्के आरक्षण. दुसरी घटना होती, कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात महिलांनी केलेला मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह आणि तिसरी, सर्वात लक्ष्यवेधी ठरलेली घटना म्हणजे, मॉडेल पूनम पांडेने विवस्त्र होण्याची केलेल्या घोषणेचा पुढील भाग! या तिन्ही घटना सामाजिकतेशी जोडलेल्या आहेत. आणि म्हणूनच त्या घटना इथलं सामाजिक नागडं सत्य सांगण्याचा प्रयत्न करताहेत.
अण्णा हजारे यांनी दिल्लीत जाऊन भ्रष्टाचाराच्याविरोधात आंदोलन छेडलं. उपोषण करत त्यांनी सरकारला लोकपाल विधेयक मान्य करण्यासाठी मजबूर केलं. अण्णांचा हा विजय देशासाठी नवी सामाजिक क्रांती घडवणारा ठरला. पुढे या विधेयकामुळे देशाला कितपत फायदा होतोय ते येणारा काळच ठरवेल. मात्र यांनतर घडलेल्या तीन घटनादेखील सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत. कारण या तिन्ही घटना महिलांशी संबंधित आहेत. एकाच आठवड्यात महिलाविषयक तीन महत्त्वपूर्ण घटना घडण्याचा बहुधा हा पहिलाच आठवडा असावा. पहिल्या महिलाविषयक घटनेत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयामुळे राज्यातील महिला शक्ती सबळ होण्याची आशा व्यक्त केली जातेय. या घटनेचा सामाजिक अंगाने विचार केला असता राजकीय पटलावरील पुरूष शक्तीला स्त्री शक्तीने दिलेला शह असं म्हणता येऊ शकतं. राजकारण ही केवळ पुरूषांचीच मक्तेदारी आहे, या वृत्तीला दिेलेलं आव्हान म्हणजेच हा महिला आरक्षणाचा निर्णय होय. वर्षेनुवर्ष पुरूष शक्तीने इथल्या राजकारणावर वर्चस्व गाजवलंय. या वर्चस्वाला दिलेला धक्का, असंही या निर्णयाबाबत सांगता येईल. दुसऱ्या मंदिर प्रवेशाच्या घटनेतही राज्यातील महिलांनी पुरूषांच्या आरक्षणाला आव्हान दिलंय. कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिराला 700 वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. इतकी वर्षं या मंदिरात अभिषेकाच्या वेळी महिलांना गाभाऱ्यात प्रवेश नाकारला जात होता. दुसऱ्या अर्थाने इथल्या पुरूषांनी मंदिराच्या गाभाऱ्यात आरक्षणाचा फायदा उचलला. म्हणूनच (खरं तर आरक्षणाच्या विरोधात नाही पण स्त्री-पुरुष समानतेसाठी तरी) महिलांनी केलेला हा मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह दखलपात्र ठरतो. मंदिरात प्रवेश मिळवून इथल्या महिलांचा सामाजिक विकास साधला जाऊ शकेल का? याबाबत सारेच साशंक आहेत. पण किमान स्त्री-पुरूष समानतेचा मुद्दा तरी या सत्याग्रहामुळे चर्चेत आला; हेही नसे थोडके!
यानंतर जी तिसरी घटना घडलीय त्या घटनेने इथल्या सामाजिक सद्यस्थितीवरच मोठ्ठं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. मॉडले पूनम पांडे हिने टिम इंडिया जर वर्ल्डकप जिंकली तर खेळाडूंच्या ड्रेसिंगरूममध्ये विवस्त्र होण्याची घोषणा केली होती. अपेक्षेनुसार या घटनेचे देशभर आणि देशाबाहेरही पडसाद उमटले. नग्न होण्याच्या घोषणेने सारेच अवाक् झाले. प्रसारमाध्यमं इतक्या वेगाने कामाला लागली की, पूनम आज तरी कपडे उतरवेल असा विचार दूरचित्र वाहिनीच्या बहुेतक दर्शकांच्या मेंदूत उठता बसता घुमू लागला. यातील अजूनही काही जण आशा लावून बसलेत. असो. पूनमने केलेली घोषणा यासाठीच महत्त्वाची वाटते की, तिने आज, 2011 मध्ये अशा प्रकारची घोषणा केल्यानंतरही इथे गदारोळ माजतो. बऱ्याच जणांनी पूनमच्या घोषणेला नैतिकतेशी जोडण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी ही घोषणा सामाजिकदृष्ट्या विघातक असल्याचा शेरा लगावला.
आपल्याकडे लैंगिकतेशी संबंधित कोणत्याच घटनेचा स्वातंत्र्य मूल्याचा आदर राखत विचार केला जात नाही. यामुळेच पूनम आणि तिची घोषणा चर्चेचा विषय ठरली. महिला आरक्षण, मंदिर प्रवेश आणि विवस्त्र होण्याची घोषणा करणं, या एकापाठोपाठ एक घडलेल्या घटना स्वातंत्र्य मूल्याशी जोडलेल्या आहेत. महिला आरक्षण ही राजकीय स्वातंत्र्याशी निगडीत असलेली घटना आहे. मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह ही सामाजिक स्वातंत्र्याशी निगडीत असलेली घटना आहे. तर विवस्त्र होण्याची घोषणा ही लैंगिक स्वातंत्र्याशी निगडीत घटना आहे. मात्र आपल्याकडे लैंगिक स्वातंत्र्यता ही भानगडच अस्तित्वात नाही. यामुळेच पूनमच्या घोषणेचा इतका बाऊ झाला. खरं तर इथल्या समाज व्यवस्थेची लैंगिकतेविषयीची व्याख्याच प्रचंड खुजी आहे. या व्याख्येत पुलिंगी व्यक्तिची स्त्रीलिंगी व्यक्तिवर असलेली "मालकी' हाच अर्थ अभिप्रेत आहे. दुसरं म्हणजे, श्लील-अश्लील, नैतिक-अनैतिक या सगळ्या मानवनिर्मित गोष्टी आहेत आणि यांनाच इथल्या समाज व्यवस्थेत जीवनमूल्यांचा दर्जा दिलेला आहे. क्षणभर या बाबी मूल्य म्हणून जरी मान्य केल्या तरी या मूल्यांमधील फोलपणा स्पष्ट होतो. कारण ही मूल्यं इथल्या समाज व्यवस्थेत असूनही इथे लैंगिक अत्याचारांच्या घटना घडतच आहेत. नव्हे देशाच्या जनगणनेप्रमाणे अशा घटनांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. स्त्रीवर बलात्कार करणाऱ्या पुरूषाला आपण काही तरी अनैतिक वागतो आहोत, याची पुसटशीही जाणीव नसते. याचा अर्थ उघड आहे की, बलात्कार करणारा पुरूष या बाबींना जीवनमूल्य मानतच नाही. पण हे फारच वरवरचं झालं किंवा ढोबळ अर्थाने पूनमच्या घोषणेतील सामाजिक परिस्थितीचा घेतलेला आढावा, असं म्हणूया हवं तर.
खरं तर पूनमच्या घोषणेचं मूळं इथल्या समाजाच्या लैंगिकतेविषयीच्या धारणेशी जोडलेली आहेत. लैंगिकतेबद्दल या समाजात अनेक समज/गैरसमज आहेत. यामुळेच पूनम पांडेने विवस्त्र होण्याची घोषणा का केली? किंवा या देशात तिला अशा प्रकारची घोषणा करणं अजिबातच भयावह का वाटलं नाही? याचा विचार करणंही क्रमप्राप्त आहे. काही संस्कृती रक्षकांनी पूनमच्या घोषणेला पब्लिसिटी स्टंटशी जोडलं. तिला प्रसिद्धी हवी होती म्हणून तिने अशी घोषणा केली आणि या घोषणेनंतर लागलीच तिला "खतरों के खिलाडी' या टिव्ही शोमध्ये संधी मिळाली, असंही म्हटलं गेलं. मुळात अंगप्रदर्शनसाठी प्रसिद्ध असलेल्या कॅलेंडरसाठी फोटो सेशन केल्यानंतर पूनमला आपसूकच प्रसिद्धी मिळाली होती. अधिक प्रसिद्ध होण्याच्या नादात तिने ही घोषणा केलीय, असा युक्तीवाद करण्यास इथे जागा आहे खरी; पण यामुळे मूळ मुद्याला बगल दिली जाऊ शकते! सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करण्यास कायद्याने बंधनकारकर आहे. तशी तरतूद इथल्या कायद्यामध्ये आहे. ही तरतूद योग्यच आहे. पण पूनमची घोषणा एवढ्याच एका घटनात्मक बाबी पुरती मर्यादित आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे. विवस्त्र होण्याची घोषणा करून पूनमला इथल्या लैंगिकतेविषयीच्या सामाजिक चौकटीला छेद देण्याचा प्रयत्न तर करायचा नाही ना?
खरं तर या सगळ्या बाबतीत तस्लिमा नसरीनने एक महत्त्वपूर्ण वाक्य लिहून ठेवलंय. विशेष म्हणजे हे वाक्य तिने बांगलादेशाची नागरिक असूनही लिहिलंय आणि आज हाच भारत देश तिच्या रक्षणाची काळजी करतोय. तस्लिमा म्हणते, "पुरूषांना जसं स्त्रीची उघडी छाती पहायला आवडतं. अगदी तसंच स्त्रीलाही पुरूषाची उघडी छाती पहायला आवडतं.' तिच्या या वाक्याचा त्या काळात शब्दश: आणि लैंगिकतेविषयीच्या संकुचित मानसिकतेतून अर्थ काढण्याचा बालिश प्रयत्न केला गेला आणि अखेर तिच्यावर मायभूमी/देश सोडण्याचा प्रसंग गुदरला!
- राकेश शिर्के (सांध्य)
THIS IS OUR RAKESH.....
ReplyDeleteWELDONE
he sagl kahi patnarch aahe sir..tarihi nehmich prashn padto aamhala 50% 33% vatni karun denare, majhya aayushyacha shariracha hava tasa suoda karnare he kon? swatala malak mhanaun ghenare he bhadve landge yanna koni aadhikar dila majhya shriravar malki gajvnyacha....lekh vachun rakh bajula hote an dhgdhgte nikhare petu lagtat..'manusmrutichi holi m karite, gulamichya bedya m todite,stridasyaha turung phodite, BADLAYA BAND M KARITE....
ReplyDelete