Tuesday, 23 August 2011

बाबरी विध्वंसाचीच ही फळं?

जुलै महिन्याच्या तेरा तारखेला मुंबई पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरली. संध्याकाळी जेव्हा हे बॉम्ब फुटले तेव्हा मी कार्यालयातच होतो. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर हे बॉम्बस्फोट झाले होते. अवघी मुंबई कळवळली  असताना माझे सहकारी स्फोटांनंतरही कार्यालयातून बाहेर पडण्यास उत्सुक नव्हते. हे चित्र बॉम्बस्फोटांच्या छायाचित्रांपेक्षा विदारक होते. अखेर माझ्या अखत्यारीत नसतानाही मी कार्यालयातून थेट घटनास्थळी पोचलो. रात्रभर तीन ठिकाणी झालेल्या स्फोटांची माहिती गोळा केली. पण हाती केवळ मृतांची नावं आणि जखमींची यादीच लागली होती. बॉम्बस्फोटाचं नेमकं कारण काही केल्या सापडत नव्हतं. म्हणून मग मेंदूवर अधिक ताण पडला तरी हरकत नाही, असं म्हणालो आणि मुंबईच्या बॉम्बस्फोटांच्या मूळाशी जाऊन पोचलो. या प्रवासात किंवा या प्रवासामुळे जे हाती लागलं तेच इथे लिहितोय.... खरं तर हा लेख मी बॉम्बस्फोटांच्या नंतर आलेल्या "आपलं महानगर'च्या रविवार आवृत्तीत प्रसिद्ध केलाय. तेव्हा माझ्या सहकार्यांसह अन्यही काही जण माझ्यावर नाराज झाले होते...

"या देशाला दहशतवादाने विळखा घातलाय,' हे वाक्य वापरून वापरून इतकं गुळगुळीत झालंय की ते लिहिण्याचीही आता लाज वाटू लागलीय. "अजून किती निष्पाप जीवांचे बळी घेणार,' असा सवाल पुसण्यातही आता काही तथ्य उरलेलं नाहीय. "देशाची सुरक्षा यंत्रणा कमकुवत आहे,' असं सांगण्याचीही आता गरज नाहीय. अशा परिस्थितीत दहशतवादावरील लिखाण करणं महाकठीण काम बनलंय. देशाचा एकही कोपरा सुरक्षित नाहीय, हे 7/13च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांनी सिद्ध करून दिलंय. 7/11च्या बॉम्बस्फोटाची 5 वर्षं पूर्ण झाल्याचं दु:ख व्यक्त करून पुर्वपदावर येत असतानाच 7/13चे बॉम्बस्फोट घडले. खरं तर मुंबईसह देशात बॉम्बस्फोट घडणं ही इतकी सततची घटना झालीय की अशा घटनांवर व्यक्त होण्यासाठीही इथला नागरिक आता कंटाळा करू लागलाय. या कंटाळ्याला आपण त्यांच्या सहनशक्ती अंत झालाय, असंही म्हणू शकतो. आज मुंबईत तर उद्या पुण्यात, परवा हैदराबादेत तर तेरवा बनारसमध्ये... बॉम्बस्फोटांचं सत्र सुरूच आहे. यातही जेव्हा जेव्हा मुंबईत बॉम्बस्फोट होतात तेव्हा तेव्हा जगभरातून "मुंबईकरांचं स्पिरीट' नावाचं मीठ मुंबईकरांच्या जखमांवर चोळलं जातं. या पूर्वी हे मीठ असरदार साबीत होत होतं. मात्र कालच्या, 7/13च्या बॉम्बस्फोटांनी या मीठालाही बेअसर करून टाकलं. मुंबईकरांनी हे "मुंबईकरांचं स्पिरीट' नावाचं मीठ निकालात काढलं. "स्पिरीट वगैरे काही नाही, हा आमचा नाइलाज आहे,' अशी खारट प्रतिक्रिया अगदी उघडपणे मुंबईकरांनी नोंदवली. या प्रतिक्रियेने इथल्या निगरगट्ट राजकारण्यांना मात्र पुरतं हादरवलं. खरं तर मुंबईकरांनी या नेत्यांना हा दणका यापूर्वीच द्यायला हवा होता. असो... "देर आये, दुरूस्त आये...'

तर कालच्या या 7/13च्या बॉम्बस्फोटांमुळे एक प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय. तसा हा प्रश्न जुनाच आहे. मधल्या काळात तो प्रश्न सोयीने विसरायला लावण्यात आला होता. पण इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते ! ती 7/13च्या बॉम्बस्फोटांमुळे झाली. या साखळी बॉम्बस्फोटांनंतर देशाची सर्वोच्च तपास यंत्रणा कामाला लागलीय. तपासात अनेक नवीन मुद्दे समोर येऊ लागलेत. संशयाच्या सूया ताशी 180 किलोमीटरच्या वेगाने फिरू लागल्यात. ही सूई कधी इंडियन मुझाहिद्दीन नावाच्या अतिरेकी संघटनेवर जाऊन थांबतेय, तर कधी आंतरराष्ट्रीय अतिरेकी म्हणून घोषित झालेल्या दाऊद इब्राहिम नावाच्या अंडरवर्ल्ड डॉनवर जाऊन उभी राहतेय. शासन, प्रशासनाने तपासात कोणतीही तडजोड करणार नाही, सर्व शक्यता तपासून पाहिल्या जातील अशी हमी दिलीय. कोणाला हमी दिलीय ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. (कदाचित स्वत:लाच दिलेली असावी.) पण तरी सुद्धा एक मुद्दा तसाच अनुत्तरीत राहतो. तो म्हणजे, हे बॉम्बस्फोट सातत्याने का होतात? या देशाने, यातही या मुंबईने कोणाचं काय घोडं मारलंय? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं इतिहासात नक्की सापडतील. जर आपण तो इतिहासही पुन्हा तपासून पाहणार असू तरच... देशात बॉम्बस्फोटांची मालिका सुरू होण्याचं एक कारण बाबरी मशिदीच्या विध्वंसात दडलंय, असा एक प्रश्न निर्माण झालाय. याच प्रश्नाच्या अनुषंगाने मुंबईकरांना तसंच समस्त भारतीयांना एक थेट प्रश्न विचारला गेला होता. बाबरी मशिद पाडल्यापासूनच देशात बॉम्बस्फोट होऊ लागलेत का? तुम्हाला काय वाटतं? असा तो प्रश्न होता. अर्थातच हा प्रश्न "फेसबुक' या सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून विचारण्यात आला होता. या प्रश्नावर लोकांकडून आलेल्या प्रतिक्रिया पुढे येतीलच, पण काहींनी या प्रश्नावर प्रतिक्रिया न देण्यासाठी जे प्रकार अवलंबले ते कुतुहल निर्माण करणारे होते. काहींनी फेसबुक ही सोशल नेटवर्किंग साइट आहे. यामुळे इथे प्रतिक्रिया देणं उचित नाही, असं मोबाइलवर मेसेज पाठवून कळवलं. काहींनी याच मोबाइल मेसेज सेवेचा उपयोग करून प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी मौन धारण करून आपली प्रतिक्रिया कळवली. एका बड्या नेत्यालाही या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यासाठी गळ घालण्यात आली होती. मात्र त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं, कळून न कळल्यासारखं आणि पाहून न पाहिल्यासारखं केलं...

बॉम्बस्फोट का होतात हे जाणून घेण्याच्या हेतूने विचारण्या आलेल्या बाबरी मशिद पाडल्यापासूनच देशात बॉम्बस्फोट होऊ लागलेत का? तुम्हाला काय वाटतं? या प्रश्नावर प्रतिक्रिया दिलेल्यांमधील पहिली प्रतिक्रिया स्वयंसेवी संस्थेत कार्यरत असणाऱ्या अजित अभिमेषी नावाच्या तरुणाची होती. तो म्हणतो, "मुंबईत नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटाचा निषेध करायलाच हवा. 12 मार्च 1993पासून सुरू झालेला हा बॉम्बब्लास्ट"चा सिलसिला थांबायचं नाव घेत नाही. बाबरी मशीद पाडल्यानंतर हजारो लोकांचे बळी गेले. त्यातूनच 12 मार्च 1993 घडलं आणि आता गेल्या काही वर्षांपासून आपण गुजरातच्या दंगलीची फळं भोगतोय. जर देशात दंगली झाल्या नाहीत तर असे ब्लास्ट होणार नाहीत. कारण क्रिया घडल्यानंतर प्रतिक्रिया ही उमटतेच. म्हणून जातीय दंगली होणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे. तसंच दंगल घडवणाऱ्याला कडक शासन झालं पाहिजे. त्याच बरोबर बॉम्ब ब्लास्ट करून निरपराध लोकांचे बळी घेतात त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. कारण न्याय मागण्याचा हा मार्ग चुकीचा आहे. तर दयानंद महर्षी महाविद्यालयात (एम. डी. कॉलेज) शिक्षिका असलेल्या पोर्णिमा जाधव-कोल्हे म्हणातात की, बाबरी मशीद हा इश्यू म्हणजे "माकडाच्या हातात कोलीत दिलेले होते.' अशा देशविरोधी कारवाया याही आधी होत होत्याच. बाबरी इश्यूनंतर तर बेटर रिजन मिळाले. 1970साली भिवंडीला झालेली जातीय दंगल... त्याची प्रतिक्रिया म्हणून बॉम्बस्फोट का नाही झाले त्या काळी? कारण त्या वेळी 2नंबरच्या धंद्यात हिंदू-मुसलमान युनिटी होती. त्यांनीच तर हा देश मोठ्या प्रमाणावर पोखरायला सुरूवात केली. फक्त ते स्लो पॉयझनिंग होतं. पुढे अंमल पदार्थांच्या तस्करीत आणि सगळ्याच 2नंबरच्या धंद्यात छोटा राजन, अमर आणि अश्विन नाईक आणि पूर्वी हाजी मस्तान, करीम लाला नंतर दाऊद आणि गॅंग या वेगवेगळ्या झाल्या. बाबरी इश्यू झाला नसता तर वेगळे कारण शोधून ब्लास्ट केले गेले असते. वैयक्तिक सूड भावनेला आता धर्माचा स्ट्रॉंग बेस मिळालाय. (खरं तर असं म्हणणं अधिक चांगलं राहिल की, या देशात राहणारे पण मनाने कदाचित एकनिष्ठ नसलेल्या लोकांचा उद्रेक बाबरी इश्यूमुळे बाहेर आला.) 1970नंतरही दाऊद अँड कंपनी भारतात होती आणि 1992 नंतरही.... मग प्रतिक्रियेमध्ये एवढा मोठा फरक का? यानंतर पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्राचा अभ्यास पूर्ण केलेल्या वाल्मिकी गायकवाड या तरूणाने आपली प्रतिक्रिया कळवलीय. त्याच्या मते, विचारण्यात आलेला प्रश्न शंभर टक्के योग्य आहे. बाबरी मशीद पाडली आणि शासनकर्त्यांनी जनमताचे राजकारण करताना आम्ही किती मुस्लीम द्वेष्टे आहोत हे दाखवण्यासाठी "अब्दुल पाकिर जब्नुआल कलाम' यांना राष्ट्रपती केलं. शासनकर्त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. हिंदू आणि मुस्लीम अशी तेढ वाढतच गेली. नंतरच्या काळात मुंबईतले स्फोट आणि गोध्रा हत्याकांडाचे पडसाद उमटत राहिले तरी याचे मूळ कारण बाबरी मशिदच आहे हे तार्किक दृष्ट्या सिद्ध होते. धार्मिक भावना दुखावण्याचे हे सगळे पडसाद आहेत, असं म्हणालो तर वावगं ठरणार नाही. खरं तर दहशतवादाचे निर्माते दुसरे तिसरे कुणी नसून राजकारणी वर्गच असतो. दहशतवादाला पूर्णविराम द्यायचा असेल तर एकमेकांच्या धार्मिकतेविषयी, भावनांविषयी आदर आणि सन्मान ठेवणं गरजेचं आहे. "शस्त्राने कधीच क्रांती होऊ शकत नाही, तसंच शस्त्राने प्रतिक्रांतीही होऊ शकत नाही,' हे जागतिक सत्य आहे. नवी मुंबईत वास्तव्यास असलेला आणि सिने जगतात कार्यरत असलेल्या बिपीन कांबळे याने, "बाबरी हे एक कारण असू शकेल. पण बाबरी पाडली नसती तरी बॉम्बस्फोट झालेच असते,' अशी "मार्मिक' प्रतिक्रिया नोंदवलीय.

यानंतर आलेली प्रतिक्रिया ही देशाबाहेरील आहे. नोकरीच्या निमित्ताने आबुधाबी या देशात काम करत असलेल्या किशोर पवार या तरूणाने विचारण्यात आलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण केलाय. तो लिहितो, "बाबरीमध्ये रामलल्ला कि अल्ला?' या एका प्रश्नाने आता पर्यंत हजारो निरपराध, निष्पाप जीवांचे बळी घेतलेत. अजून त्या रामलल्ला कि अल्ला ला किती रक्तपात पहायचाय कोणास ठाऊक? किशोरने या त्याच्या संतापानंतर प्रदिर्घ प्रतिक्रिया लिहिलीय. त्याच्या मतेही विचारण्यात आलेला प्रश्न योग्यच आहे. तो म्हणतो, "होय बाबरीनंतरच...' पुढे किशोर असंही म्हणतो की, मुंबई आणि महाराष्ट्रात 93च्या पूर्वीही असे धार्मिक तणाव किंवा दंगली झाल्यात. पण त्यात अशी किड्या-मुंग्यांप्रमाणे माणसं मारली गेली नाहीत. कुठे शिवजयंतीच्या मिरवणुकीत तणाव तर कुठे संदलमध्ये... केवळ दोन गटातला तणाव... पण बाबरी पाडली आणि या भयाण सूड चक्राला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. मुंबईत दंगल आणि त्यानंतर बॉम्बस्फोटांची मालिका... तिकडे गोध्रा जाळले, इकडे पुन्हा बॉम्बस्फोट... मालेगाव कधी पुणे... कुणाचा हिरवा दहशतवाद तर कुणाचा भगवा... हेतू एकच बेसावध माणसं मारणं... हे ओरिसामध्ये स्टेनसकट त्यांच्या मुलांना जाळून मारतात, कधी मालेगावला बॉम्ब फोडतात. आणि ते पाकिस्तान किंवा बांगलादेशातून माणसं आणून त्यांच्या साथीने धमाके करून निघून जातात. यात राम मेला की रहिम? काही देणं घेणं नाही... यांचा प्रखर राष्ट्रवाद तर त्यांचा इस्लामसाठी जिहाद... आखाती देशात नोकरीसाठी गेलेल्या किशोरच्या प्रतिक्रियेनतंर मराठी मालिकांसाठी संवाद लेखन करणारा, नाटककार, पटकथाकार स्वप्निल गांगुर्डे या तरूण लेखकाने आपली प्रतिक्रिया नोंदवलीय. तो म्हणतो, "दहशतवादाला चेहराही नाही आणि मेंदूही नाही.... बॉम्बस्फोट घडवण्यासाठी निमित्त कशाला हवंय? बाबरीचा इतिहास तर साऱ्यांना ठाऊक आहे. ते जर कारण असतं तर केवळ मुंबई टार्गेट केली गेली नसती. आपलं शासन षंढ आहे हे वारंवार सिद्ध करण्याचाच हा प्रयत्न आहे. भारतमातेने हातात बांगड्या भरलेल्या आहेत, याची जाणीव करून दिली जातेय. आपण त्यांची दोन (कसाब आणि अफजल गुरू) माणसं मारू शकत नाही. पण ते आपली शेकडो माणसं मारण्याची ताकद ठेवतात, यातच सारं काही आलं...'

बाबरी मशिद पाडल्यापासूनच देशात बॉम्बस्फोट होऊ लागलेत का? तुम्हाला काय वाटतं? या प्रश्नांवर आलेल्या या प्रातिनिधीक प्रतिक्रियांवरून निष्कर्ष काढणं कदाचित घाईचं ठरेल. पण या शक्यतेकडे कानाडोळा करून चालणार नाही. तसं झालं तर पुन्हा एकदा राजकारण्यांना "मुंबईकरांचं स्पिरीट' नावाचं ते जालिम मीठ चोळण्याची संधी मिळेल...!
                                                                                                                              
                                                                                                                           - राकेश शिर्के  (सांध्य)

Friday, 19 August 2011

आरक्षण : डोंगर पोखरून उंदीर काढला

"इस देश में दो भारत बसते है...' हा डायलॉग ऐकायला जबरदस्त वाटत असला तरी सुद्धा त्याची कारणमिमांसा करताना मेंदूची शकलं नाही पडली तरच नवल! या देशाची आजवरची सामाजिक स्थिती अभ्यासणाऱ्यांनी याचा पुरता अनुभव घेतलाय. हा देश स्वतंत्र्य झाल्यापासून या देशाला एक प्रश्न कायम भेडसावतोय. पण तो प्रश्न आहे की अधिकार यावरही आजतागायत एकमत होऊ शकलेलं नाही. तर याबाबतचं लोकमतही अजून स्पष्ट झालेलं नाही. आताशा एकाच देशात दोन देश राहताहेत इथपर्यंत या प्रश्नाने मजल गाठलीय. तर अशा या गंभीर प्रश्नाचं नाव आहे "आरक्षण.'  देशातील सामाजिक, आर्थिक आणि अन्य साऱ्याच बाजूने मागास असलेल्या घटकाचा विकास होण्यासाठी आवश्यक असलेली पायरी म्हणजे आरक्षण, अशी ढोबळ अर्थाने आरक्षण या शब्दाची व्याख्या करता येऊ शकते. तसंच या देशात केवळ साडेतीन टक्के लोकसंख्या वगळता उर्वरित सारी लोकसंख्या कोणत्या ना कोणत्या कारणाने मागास म्हणूनच गणली जाते. अर्थातच हे विभाजन जाती/धर्माच्या निकषावर करण्यात आलंय. याचाच दुसरा अर्थ, साडेतीन टक्के इतकं प्रमाण असलेली विशेष जात मागास नाही बाकी साऱ्या जाती मागास आहेत आणि देशातील आतापर्यंत नमूद झालेल्या दाखलेबाज जातींची यादी देण्याची गरज सूज्ञ वाचकाला नाही. तर मग केवळ साडेतीन टक्के प्रमाण असलेल्यांना आरक्षित करून उर्वरित सगळ्या जातींना आरक्षणाच्या कचाट्यातून मुक्त का करत नाहीत?

पण हे इतकं सोपं नाहीय. याकरीता पुन्हा एका क्रांतीचीच गरज आहे. असो. तर असा हा "आरक्षण'चा मुद्दा या देशात सातत्याने चघळला जातोय. यात अपेक्षेप्रमाणे दोन गट आहेतच. एक आरक्षणाच्या समर्थकांचा आणि दुसरा विरोधकांचा. पण या दोन्ही गटांत आरक्षणाबाबतच्या ठाम भूमिकेचाच अभाव आहे. म्हणजे आरक्षणाला आपण विरोध का करतोय आणि समर्थन का देतोय हे अद्याप कोणीच स्पष्टपणे सांगू शकलेलं नाहीय. काही अभ्यासक याला नक्कीच अपवाद आहेत. मुद्दा असा आहे की, आपल्याकडे आरक्षण हा शब्द नुसता उच्चारला तरी समोर येतं ते शिक्षणक्षेत्र. शिक्षणक्षेत्रात केवळ आरक्षणामुळेच गोंधळ होतोय, असं एक चित्र आपल्यासमोर उभं राहतं. मागासवर्गियांचे आरक्षणाच्या नावाखाली लाड पुरवले जाताहेत, खुल्या प्रर्वगातील लोकांचं आरक्षणामुळे मोठं नुकसान होतेय, आरक्षणामुळे कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजात, उच्च अभ्यासक्रमांत प्रवेश दिला जातोय आणि यामुळे अमागास जातीतील विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळून सुद्धा प्रवेश नाकारला जातोय, असे अनेक चुकीचे समज आजही आरक्षणाच्याबाबतीत या समाजात जिवंत आहेत. यामुळे शिक्षणक्षेत्राव्यतिरिक्त अन्य क्षेत्रातील आरक्षणाविषयी कोणीच काही बोलत नाही. उदा. देशभरातील मंदिरात एका विशिष्ट जातीच्याच लोकांना पुजापाठ करण्याचा असलेला अधिकार हा मुद्दा आरक्षणाशी निगडीत नाही का? पण याकडे सोयीस्करित्या कानाडोळा केला जातो. असाच कानाडोळा प्रकाश झा यांनी "आरक्षण' या त्यांच्या बहुचर्चित सिनेमाच्या पटकथेकडे केला आहे.
देशभर वादळ उठवून प्रकाश झा यांनी "आरक्षण' प्रदर्शित केला. एका बड्या खासगी कॉलेजात आरक्षणाच्या मुद्यावरून कसा हलकल्लोळ माजतो हे दर्शवणारा हा सिनेमा आहे. शकुंतला ठकराल महाविद्यालय अर्थात एसटीएम नावाचं एक नामांकित कॉलेज असतं. ज्याचे प्राचार्य असतात डॉ. प्रभाकर आनंद (अमिताभ बच्चन). (डॉ प्रभाकर आनंद आणि "मोहब्बते'मधील गुरुकुलचे प्राचार्य नारायणशंकर यांच्यात तसूभरही फरक नाहीय.) याच कॉलेजात त्यांचा आवडता विद्यार्थी असतो दिपक कुमार (सैफ अली खान). दिपक कुमार मागासवर्गातील असूनही अत्यंत हुशार विद्यार्थी असतो. त्याचं प्रभाकर आनंदच्या मुलीशी, पुरबी (दीपिका पादुकोण)शी सूत जुळलेलं असतं. तिही याच कॉलेजात शिकत असते. (या प्रेमकहाणीत सुद्धा "मोहब्बतें'ची याद येते.) या दोघांचा अजून एक मित्र असतो सुशांत (प्रतीक बब्बर). सुशांत सवर्ण असतो. सारं काही सुरळीत सुरू असतं. सगळे विद्यार्थी, शिक्षक गुण्यागोविंदाने "एसटीएम' नामक बड्या कॉलेजात शिकत असतात. शिकवत असतात. पण अचानक सर्वोच्च न्यायालय ओबीसींच्या आरक्षणासंबंधी निकाल देतं आणि ओबीसी विद्यार्थ्यांचा एक गट मिरवणूक काढत कॉलेजात शिरण्याचा प्रयत्न करतो. कॉलेजचं वातावरण बिघडतं. दिपक कुमार आणि सुशांत आपापल्या जमातीच्या बाजूने भांडायला लागतात. रागाच्या भरात दिपक कुमार प्रभाकर आनंदवर जातीयवादाचा आरोप करतो. याचा राग येऊन पुरबी दिपक कुमारसोबतचे प्रेमसंबंध तोडून टाकते. पुढे एका मंत्र्याच्या भाच्याला एसटीएममध्ये ऍडमिशन मिळत नाही. म्हणून तो मंत्री राजकीय खेळी खेळून प्रभाकर आनंद आरक्षणाच्या बाजूचा आहे असं कॉलेजच्या ट्रस्टींना सांगतो आणि प्रभाकर आनंदला प्राचार्य पदावरून पायउतार होण्यास भाग पाडतो. या राजकीय खेळाची दुसरी बाजू असते खासगी शिकवणी अर्थात कोचिंग क्लासेसचा बिझनेस. हा बिझनेस एसटीएममधील मिथिलेश सिंग (मनोज वाजपेयी) नावाचा प्राध्यापक करत असतो. याला एसटीएममध्ये परवानगी नसते. तर मिथिलेश सिंग आरक्षणविरोधी असतो. मंत्री, मिथिलेश सिंग आणि कॉलेजचे ट्रस्टी मिळून प्रभाकर आनंदला कॉलेजातून काढून टाकतात. त्याचं घरही बळकावतात. त्याच्या घराची मजेशीर गोष्ट आहे. खरं तर अशा अनेक मजेशीर गोष्टी या एकाच सिनेमात गुंफण्यात आल्यात. यामुळे एका क्षणाला प्रभाकर आनंदच्या बाजूची माणसं त्याच्या विरोधात जातात तर काही क्षणांच्या विश्रांतीनंतर तिच माणसं पुन्हा त्याला येऊन मिळतात. हे असं का होतं? याचं उत्तर पडद्यावर "दी एंड'ची पाटी झळकली तरी सापडत नाही. पुढे मग प्रभाकर आनंद स्वत:वर लावलेले सारे आरोप खोटे ठरवण्यासाठी एका तबेल्यात मोफत शिकवणी सुरू करतो. अर्थातच तो तबेला मागासवर्गियांच्या वस्तीत असतो. तो त्याच वस्तीतील विद्यार्थ्यांना मोफत शिकवू लागतो आणि चमत्कार होतो. कालपर्यंत पन्नास-पंचावन्न टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी साठ-सत्तर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होतात. याचा परिणाम मिथिलेश सिंगच्या प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवरही होतो. मग या दोघांमधील शीतयुद्ध अधिक पेटतं आणि सिनेमा शेवटाकडे प्रवास करू लागतो.
या सगळ्या गदारोळात दिग्दर्शक प्रकाश झा यांना ते आरक्षणाच्या मुद्यावर सिनेमा बनवताहेत याचा विसर पडतो. खरं तर यात दिग्दर्शकाची चूक नाहीय. त्यांना आरक्षणाचं निमित्त साधून शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचारावर "प्रकाश' टाकायचा होता. पण त्यांच्या पटकथेच्या स्पॉटचा लाईट चुकला. तो सिनेमाभर इथे तिथेच पडत राहिला. नेमक्या विषयावर तो "प्रकाश' पडला असता तर "आरक्षण'मधील एखादा तरी मुद्दा प्रेक्षकांच्या नजरेस पडला असता. आरक्षणावर मेरीट हे सोल्युशन म्हणून देण्याचा प्रकाश झा यांचा प्रयत्नही फसवाच वाटतो. तसंच प्रभाकर आनंद मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिकवणी घेतो म्हणून ते मेरीटमध्ये येतात का, असा प्रश्नही मेंदूत पिंगा घालू लागतो. कारण प्रभाकर आनंद सवर्ण असतो. पण त्याला समाजातील मागास घटकांबद्दल आत्मियता असते. सिनेमा मल्टी स्टारकास्ट आहे. यामुळे त्यांच्या अभिनयाबद्दल सांगण्यात काहीच मतलब नाही. अमिताभ बच्चन प्राचार्याची भूमिका छान वठवतात, हेही वेगळं सांगण्याची गरज नाहीय. मनोज वाजपेयीचा खलनायकही मस्त रंगलाय. तो जेव्हा जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा तेव्हा राग येतो. दीपिका पडद्यावर खुपच गोड दिसते. याचं श्रेय तिच्या ड्रेस डिझायनरला द्यायला हवं. अतिशय साध्या कपड्यात दीपिकाला पडद्यावर सादर करण्याचा वेशभूषाकाराचा निर्णय कामी आलाय. सैफचा मिशीवाला लूकही मस्त आहे. फक्त त्याने थोडासा अभिनय करून संवाद फेकले असते तर त्याची ती मिशी अधिक उठून दिसली असती. प्रतीक बब्बरला दिग्दर्शकाने नेमकं काय करायला सांगितलं होतं आणि तो काय करतो याचा थांगपत्ताच लागत नाही. कदाचित यात त्याची चूक नसेल. कारण पटकथेत साऱ्याच पात्रांचा गोंधळ उडालाय. पण एक कॉलेजकुमार म्हणून प्रतीक पडद्यावर मस्त दिसतो. सिनेमात अन्य पात्रही आहेत. यात तन्वी आझमी, विनय आपटे, हेमा मालिनी, यशपाल शर्मा यांचा समावेश आहे. सिनेमात दोन गाणी खुपच मस्त आहेत. एक म्हणजे "सीधे लाईन पे आओ ना...' आणि "इक मौका दे दो...' हे दुसरं गाणं. मात्र प्रसून जोशीने लिहिलेली आणि शंकर, एहसान, लॉय या त्रिकुटाने संगीत दिलेली ही दोन्ही गाणी वाया गेलीत. अन्य गाण्यांच्या बाबतीतही तेच घडलंय. गाण्यांचं प्लेसिंगच चुकलंय. खरं तर प्रकाश झा यांनी लिहिलेल्या सिनेमाच्या कथा, पटकथेचंही प्लेसिंग चुकलंय, असंच म्हणावं लागेल. कारण इतके दिवस आरक्षण... आरक्षण करून डंका पिटवल्यानंतर हाती काहीच लागत नसेल तर मग डोंगर पोखरून उंदीर काढला असं म्हणण्याशिवाय गत्यंतरच उरत नाही.

- राकेश शिर्के (सांध्य)

बिनपाटाचा "मोरया'

स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील लोकांनी, विशेषत: महाराष्ट्रातील लोकांनी एकत्र येऊन ब्रिटाशांविरोधात लढा उभारावा, या हेतूने लोकमान्य टिळक यांनी दोन उत्सवांना सुरूवात केली. यातील एक उत्सव होता सार्वजनिक गणेशोत्सव आणि दुसरा शिवजंयती. या दोन्ही उत्सवांच्या निमित्ताने लोक एकत्र येतील, ब्रिटीशांविरोधी लढ्याची आखणी करतील आणि इंग्रजांना देशातून हाकलवून देऊन देश स्वतंत्र करतील, असे उद्देश या उत्सवांच्या साजरीकरणामागे होते, असं आपल्याला इयत्ता पाचवीत शिकवलं गेलंय. पण पाचवीतील हा इतिहास कधीच कालबाह्य ठरलाय. म्हणजे, देश स्वतंत्र झालाय म्हणून हा इतिहास कालबाह्य ठरलेला नाहीय; तर गणेशोत्सव आणि शिवजयंती या उत्सवांच्या आजच्या साजरीकरणामुळे तो कालबाह्य ठरलाय. पण हा सारा इतिहास महाराष्ट्रीयनसकट साऱ्यांनाच तोंडपाठ झालाय. आज उत्सवांच्या नावाखाली बाजार मांडला जातोय, या मताचे विरोधक सापडणं कठीणच आहे. खास करून गणेशोत्सवाच्या बाबतीत अर्ध्याहून अधिक लोक या मताशी सहमत आहेत. मग हे सगळं नव्याने सांगण्याची गरज काय? किंवा हेच सांगायचं होतं तर त्यासाठी सिनेमाच्या काही रिळांचा चुराडा करण्याची गरजच काय? हे दोन्ही प्रश्न अतुल कांबळे- अवधूत गुप्ते निर्मित आणि अवधूत गुप्ते दिग्दर्शित "मोरया' हा सिनेमा पाहिल्यानंतर मेंदूत पिंगा घालतात.

खरं तर गणरायाची उंच मूर्ती बनवायची असेल तर त्याचा पाट आधी भक्कम असावा लागतो. किंवा श्रींच्या मूर्तीच्या आकाराप्रमाणे त्याचा पाट तयार करणं क्रमप्राप्त आहे. असं झालं नाही तर मूर्तीचा तोल ढळू शकतो! असंच काहीसं अवधूत गुप्ते कृत "मोरया'चं झालंय. "मोरया'चा पाट म्हणजे त्याची पटकथा. पण सचिन दरेकरने लिहिलेल्या या पटकथेत मोरयाचा हा पाट भक्कमपणे बनवला गेला नाहीय. सिनेमाची कथा साधीसरळ, आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. दोन चाळीतील पोरांची एकमेकांशी असलेली ठसन आणि त्या ठसनमधून गणेशोत्सव साजरा करताना त्यांच्यात लागलेली जीवघेणी स्पर्धा. या स्पर्धेत गणेशोत्सवाचं बाजारीकरण होतंय, हे सांगण्याचा प्रयत्न सचिन दरेकरने केलाय. पण हा प्रयत्न 2011मध्ये करताना आजच्या परिस्थितीचं भान राखणं आवश्यक होतं. किंवा माहित असलेल्या गोष्टीच्या पुढची गोष्ट सांगण्यात खरी गम्मत होती. पण ही गम्मत "मोरया'च्या टिमला करता आली नाही.

अवधूतने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात गिरणगावातील टिपिकल दोन चाळी दाखवण्यात आल्यात. एक म्हणजे खटाव चाळ आणि दुसरी आहे गणेश चाळ... खटाव चाळीतील पोरांचं नेतृत्त्व समीर सय्यद (चिन्मय मांडलेकर) करत असतो तर गणेश चाळीचा भाई मनिष शिंदे (संतोष जूवेकर) असतो. ("मोरया'मुळे पुन्हा एकदा गिरणगावचा पोरगा म्हणून संतोषची जागा पक्की झालीय.) या दोघांमध्ये ठसन असते. ही ठसन सिनेमाच्या पहिल्याच फ्रेमपासून दिसायला लागते. जेव्हा मन्या आणि त्याची पोरं दहीहंडीच्या थरांचा सराव करत असतात. समीर मन्याच्या गोंविदात सामील होणाऱ्या दुसऱ्या चाळीच्या पोरांना फोडतो आणि स्वत:च्या गोविंदा पथकात सामील करून घेतो. मन्या त्या गद्दारी केलेल्यांपैकी दोन पोरांना उचलून आणतो आणि फोडून काढतो. तेव्हा समीर मन्याच्या गच्चीत येऊन मन्यालाच त्याच्या पोरांसमक्ष कोयत्याच्या जोरावर हग्या दम देतो आणि त्या दोन पोरांना सोडवून निघून जातो. या दृश्यात चिन्मयनची इंट्री आहे. जी अतिशय भन्नाट आहे. मग दहीहंडीचा दिवस उजाडतो. दोन्ही गोविंदा पथकं दहा थरांची हंडी फोडायला निघतात. अर्थातच सिनेमाचं संगीत अवधूत गुप्तेचं आहे तर मग हंडीचं एक सॉलिड गाणं सिनेमात असंण स्वाभाविकच आहे. परवा साजरा होणाऱ्या दहिकाल्यात "मोरया'चं हे गाणं हमखास वाजवलं जाणार. कारण ते गाणं मस्तच आहे आणि खास करून ते तोंडावर आलेल्या दहीहंडीसाठीच खास बनवलं गेलंय. पुढे, त्या दहा थराच्या हंडीचं काय होतं ते मात्र कळत नाहीय. कारण ती हंडीच सिनेमात कुठे दिसत नाही. पण तरीही मन्या आणि समीरमध्ये हंडी कोण फोडणार यावरून समुद्र किनाऱ्यावर मारामारी होते. पोलीस येतात आणि दोघांनाही पकडून नेतात. तेव्हा दोन्ही चाळींच्यामध्ये कामत खाणावळ चालवणारे कामत काका (दिलीप प्रभावळकर) हातात रुद्राक्षाची माळ घालून पोलीस ठाण्यात येतात आणि दोघांची जामीनावर सुटका करतात. कामत काकांनी अपेक्षेप्रमाणे उत्तम काम केलंय. पण दिग्दर्शकाला त्यांचा योग्य वापर करून घेता आलेला नाहीय. तर, दोघंही आपापल्या चाळीत परतात. तेव्हा त्यांना कळतं चाळ पाडून टॉवर बांधण्यासाठी चाळकऱ्यांनी बिल्डरला परवानगी दिलीय. पण दोन्ही चाळी एकत्र करून एकच कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. म्हणून मग कोणत्या तरी एका चाळीचा यंदाचा शेवटाचा गणेशोत्सव असणार आहे. आता हा शेवटचा गणेशोत्सव कोणाचा? गणेश चाळीचा की खटाव चाळीचा? हे ठरवणं कामत काकांनाही मुश्किल होतं. समीर आणि मन्या माघार घेण्याचा प्रश्नच नसतो. म्हणून मग यंदा ज्यांचा गणेशोत्सव मोठा तेच मंडळ पुढल्या वर्षीही गणेशोत्सव साजरा करेल, असा सुवर्णमध्य काढला जातो. आणि मग सुरू होतो आपलाच गणेशोत्सव मोठा आहे हे सिद्ध करण्याचा खेळ...

समीर मुसलमान असूनही गणेशोत्सव साजरा करत असतो. पण या मागे त्याची गणेशभक्ती प्रामाणिक असते. म्हणून मग तो एका मुस्लीम ट्रॅव्हल कंपनीच्या मालकाची भली मोठी वर्गणी स्वीकारतो. तेही इच्छा आणि तत्त्वात बसत नसतानाही. कारण मोठा गणेशोत्सव साजरा करायचा तर पैसा लागणारच. अशीच परिस्थिती गणेश चाळीच्या पोरांचीही असते. मन्या एका स्थानिक आमदाराकडून तगडी वर्गणी मिळतो. मग दोन्ही गणेश मंडपं सजू लागतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही गणपती बाप्पा दोन्ही मंडपात विराजमान होतात. पण काय केलं तर आपल्या मंडळाच्या गणपतीलाही "लालबागचा राजा'सारखी प्रसिद्धी मिळेल, असा प्रश्न समीर आणि मन्याच्या मेंदूत घुमू लागतो. गणेश मंडळाला प्रसिद्धी मिळवण्यासाठी मग समीर-मन्यामध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू होते. समीर मुस्लीम असल्याचा फायदा घेत आपला गणपती सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारा गणपती आहे, असं चॅनेलवाल्यांना कळतो. तेही तडक मंडपात पोचतात आणि ब्रेकिंग न्यूज देऊन टाकतात. असंच काहीसं मन्याही करतो. तो चाळीतील लग्नाच्या सात वर्षांनंतर घरात पाळणा हलणाऱ्या दाम्पत्याला गणेश चाळीच्या गणरायाला नवस केल्यामुळेच पाळणा हलला असं चॅनेलवाल्यांना सांगण्यास भाग पाडतो आणि प्रसिद्धी मिळवतो. नंतर मात्र ही स्पर्धा वेगळ्याच वळणावर जाते. दोन्ही मंडळांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन स्थानिक राजकारणी शहरात जातीय दंगे भडकवतात. खूप शाब्दीक खूनखराबा होतो. पार  मुंबईत कर्फ्यू लागण्यापर्यंत या दोन चाळींच्या गणेश मंडळातील मॅटर पोचतं. हे दंगे शमवण्यासाठी गणेश यादवला इन्स्पेक्टर बनवण्यात आलंय. गणेशने भन्नाट पोलीसवाला उभा केलाय. पण तो एकटाच पोलीस खात्यात असल्याचं राहून राहून वाटतं. कारण शहरात कर्फ्यू लागलेला असतानाही पडद्यावर केवळ गणेश आणि त्याच्या पोलीस व्हॅनमध्ये सामावतील इतकेच पोलीस दिसतात.

"मोरया'ची कथा-पटकथा अजिबात नवीन नाहीय. त्यामुळे तोच तोच विषय पडद्यावर पहावा लागतोय. म्हणजे उत्सवांसाठी वर्गणी मागितली जाते की खंडणी, आपल्याच गणेश मंडळाला प्रसिद्धी मिळाली पाहीजे, मग त्यासाठी वाट्टेल ते करू, गणेशोत्सवात मनोरंजनाच्या नावाखाली बाया नाचवणं, मंडळाच्या मागच्या बाजूचं दारूच्या आणि जुगाराच्या अड्ड्यात रुपांतर होणं, पैसे देऊन सेलिबे्रटी बोलावणं आणि त्यांच्या नावावर प्रसिद्धी मिळवणं हे आणि असे अनेक विषय "मोरया'त आहेत. ज्यातील एकही विषय किंवा मुद्दा नवीन नाहीय. सिनेमात स्पृहा जोशी आणि परी तेलंग यांनाही घेण्यात आलंय. यात स्पृहा मन्याची गर्लफ्रेंड असते. पण ती बारमध्ये सिंगर म्हणून काम करत असते. अवधूतने स्पृहाचं बारसिंगर म्हणून काम करण्याचं जे कारण सांगितलंय ते भन्नाट आहे. बारमध्ये गाणी गायल्यामुळे तिची गाणी सेट होतात, तिला स्टेज प्रेझेन्स समजतो, लोकांपुढे तिला गाणं सादर करण्याची संधी मिळते वगैरे वगैरे कारणं स्पृहाच्या बारमध्ये गाणं गाण्याच्या मागे आहेत. ही कारणं एवढ्यासाठीच भन्नाट आहेत की, अशी कारणं आजवर कोणीच सांगितलेली नाहीत. हीच गत परी तेलंगची झालीय. ती एका टीव्ही चॅनेलची पत्रकार असते. ब्रेक्रिंग न्यूजच्या नादात ती समीरच्या प्रेमात पडते. पण ती प्रेमात पडलीय हे आपल्याला परी चिन्मयाचा हात पकडते असं एकच दृश्य सिनेमात आहे त्यातून समजून घ्यावं लागतं. तेही तिने हात पकडल्यावर चिन्मय तिच्याकडे एका विशिष्ट नजरेने पाहतो म्हणून आपल्याला ते समजतं. बाकी सिनेमात धनश्री कोरेगावकर, पुष्कर श्रोत्री, विमल म्हात्रे, मेघना एरंडे, सुनील रानडे, सुनील गोडसे आदी कलाकारांनीही चोख कामगिरी बजावलीय. सिनेमाची गाणी गुरू ठाकूर, संदीप खरे, अरविंद जगताप, अवधूत गुप्ते यांनी लिहिलीत. सिनेमात अवधूत आणि सुबोध भावेवर चित्रीत केलेली एक कव्वाली आहे. या कव्वालीसाठी अवधूतचं करावं तितकं कौतुक थोडंच आहे. कारण गणपतीवर कव्वाली ही कल्पनाच भन्नाट आहे. यातही कव्वालीतून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असणाऱ्या गणरायाला "मौला मेरे मौला' म्हणणं हे खरोखरच महाराष्ट्रात धाडसाचंच काम आहे. अवधूतने हे यशस्वी धाडस केलंय. कव्वालीही मस्त आहे. ती कव्वाली यंदाच्या गणेशोत्सवात वाजवली जातेय की नाही हे पहाणं उत्सूकतेचं ठरेल.
गणेशाची मूर्ती जितकी उंच तितका मूर्तीचा पाट मजबूत, या नियमाप्रमाणे जर "मोरया"च्या पटकथेला मजबूत करण्यात आलं असतं तर खरोखरच एक उत्तम सिनेमा तयार झाला असता. अफसोस, इयत्ता पाचवीतील इतिहास सांगण्याच्या नादात हा बिनपाटाचाच "मोरया' तयार करण्यात आला.
- राकेश शिर्के (सांध्य) 

एका 'ब्लफमास्टर'चे दोन भन्नाट किस्से


- त्याने बायकोच्या भांगेत कुंकूऐवजी लिपस्टिक भरली!

- त्याला नर्गिसने किस करण्याचं वचन दिलं होतं! 


         हिंदी सिनेमाचा 'जंगली' कलाकार काळाच्या पडद्याआड गेलाय. रुपेरी पडदा फिक्का पडलाय; पण येणं आणि जाणं हे निसर्गचक्र आहे. जे प्रत्येकाच्या वाट्याला आलंय. म्हणून माणसाचं जगात येणं आणि त्याचं जगातून निघून जाणं याचा शोक करत बसण्यापेक्षा त्याच्या आठवणींना सतत उजाळा देण्याचा प्रयत्न करणंच योग्य ठरेल. आठवणींच्या मदतीने आपल्या लाडक्या, आवडत्या व्यक्तिंना याद करणं, त्याच्या जाण्याची आठवण विसरायला मदतगार ठरतं. अगदीच हेच शम्मी कपूर यांच्याबाबतीत करणं उचित आहे. त्यांच्या आठवणी इतक्या आहेत की, त्या आयुष्यभर पुरतील. दररोज एक आठवण या प्रमाणात जरी आपण शम्मीजींना याद केलं तरी आयुष्य त्यांच्या आठवणीत कधी सरून जाईल, ते कळायचं सुद्धा नाही. म्हणून त्यांच्या आयुष्यातील या दोन भन्नाट आठवणी... कदाचित हीच त्यांना वाहिलेली आदरांजली...!

शमशेर राज कपूर उर्फ शम्मी कपूर यांनी हिंदी सिनेसृष्टीचा पन्नास ते सत्तरचा काळ गाजवला. नव्हे, आपला ठसा उमटवला. या काळावर राज कपूर, दिलीप कुमार आणि देवानंद यांचं अधिराज्य होतं. पण शम्मीजींनी या तिघांशी कधीच स्पर्धा केली नाही तर आपल्या अभिनयाच्या आणि 'याहू' अदाकारीने रुपेरी पडद्यावर आपलं नाव कोरलं. तर, शम्मीजींच्या लग्नाचा एक भन्नाट किस्सा आहे. तो काळ होता 1955चा. या काळात प्रेमविवाह हा विषय केवळ सिनेमा पुरताच मर्यादित होता. अशा काळात शम्मीजींचं आघाडीची अभिनेत्री गीता बाली हिच्यावर प्रेम जडलं. शम्मीजी तेव्हा अवघे तेवीस वर्षांचे होते तर गीता बालीचं वय होतं चोवीस... प्रेम चांगलंच बहरलं... बात अगदी लग्नापर्यंत जाऊन पोचली. पण ठाऊक होतं घरातून लग्नाला परवानगी तर मिळणारच नाही उलट अडचणी आणखी वाढतील. म्हणून मग शम्मीजींनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. अर्थात या निर्णयात गीता बाली त्यांच्यासोबत होत्याच. आपला सर्वात जवळचा मित्र वाडीया याला घेऊन शम्मीजी आणि गीता बाली दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बाणगंगा मंदिरात पोचले. कारण की पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय या दोघांनी अतिशय तडकाफडकी घेतला होता म्हणून मग वेळेचं बंधन त्यांना पाळणं अशक्य होतं. हे प्रेमीयुगुल जेव्हा बाणगंगा मंदिरात पोचले तेव्हा रात्रीचे साडेअकरा वाजले होते. मंदिराच्या पुजाऱ्याने सांगितलं, 'आता मी तुमचं लग्न लावू शकत नाही. कारण देव झोपलाय.' हे ऐकल्यावर शम्मीजींची अवस्था अतिशय केविलवाणी झाली होती. अगदी सहजच त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, "उफ्‌ इस भगवान को भी अभी सोना था?' आता काय करायचं? या विवंचनेत शम्मीजी, गीता बाली आणि त्यांचा मित्र वाडीया माघारी फिरले. आता कुठे जायचं? घरी गेलो तर खैर नाही... म्हणून मग दोघंही माटुंग्याच्या एका हॉटेलात येऊन थांबले. रात्र वैरीण बनली होती. सोबत प्रेम असतानाही शम्मीजींच्या जीवाची नुसती तगमग होत होती. अखेर घडाळ्याच्या काट्याने रात्रीचे चार ओलांडले. तसे हे दोन प्रेमीजीव पुन्हा एकदा बाणगंगा मंदिरात दाखल झाले. पुजाऱ्यानेही देव झोपून उठल्याचं सांगत दोघांचं लग्न लावून दिलं. आणि अचानक लक्षात आलं सौभाग्याचं लेणं म्हणून गीता बालीच्या भांगेत भरण्यासाठी कुंकूच सोबत आणलं नाहीय. आजवर सिनेमातून "मांग भरण्याची' पाहिलेली दृश्य सटासट शम्मीजींच्या डोळ्यांसमोरून सरकत गेली. तेवढ्यात गीता बालीने कधीच आणि कोणीच कल्पना करू शकणार नाही अशी कृती केली. लगबगीने स्वत:च्या पर्समधून लिपस्टिक बाहेर काढली आणि शम्मीजींच्या हातात देऊन म्हणाली, 'लो इससे भरो मेरी मांग...' शम्मीजी क्षणभर त्यांच्या लाडक्या प्रियतमेकडे पाहत राहिले आणि कळत नकळतच त्यांनी गीता बालीच्या भांगेत लिपस्टिक भरली. (खरं तर लिपस्टिक लावली, असं म्हटलं पाहिजे.)
शम्मी कपूरजींचा हा किस्सा त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि आवडता किस्सा आहे. याची कबुली त्यांनी स्वत:च दिलीय.

शम्मीजी नर्गिसचे मोठे चाहते होते. एकदा तरी नर्गिसला भेटावं, तिला डोळे भरून पहावं, तिला सांगावं मी तुझा मोठा फॅन आहे, असं शम्मीजींना सतत वाटत होतं. अचानक एकेदिवशी त्यांना कळलं की, नर्गिस आर. के. स्टुडीओत आलीय. नर्गिसला पाहण्याची ही संधी अजिबात वाया जाऊ द्यायची नाही, असा विचार करून स्वारी चेंबूरच्या आर. के. स्टुडिओत पोचली. हा किस्सा आहे शम्मीजी अवघे सतरा वर्षांचे असतानाचा... मोठा भाऊ, राज कपूर याचा दरारा माहीत असूनही आणि त्यांना कामात कोणीही अडथळा आणलेला खपत नाही हे ठाऊक असतानाही शम्मीजी काहीसे घाबरतच स्टुडिओत पोचले. त्यांची नजर सेटवर केवळ एकाच व्यक्तिचा शोध घेत होती. नर्गिसचा.... पण ती कुठेच दिसेना. एवढ्यात कुणी तरी सांगितलं नर्गिसजी त्यांच्या खोलीत आहेत. शम्मीजी आनंदीत झाले. नर्गिसला खोलीत भेटणं केव्हाही सुरक्षित आहे, असा विचार करून त्यांची पावलं नर्गिसच्या खोलीकडे सरकली. थोडंसं बिचकतच शम्मीजींनी नर्गिसच्या खोलीचं दार ढकललं. तेव्हा आतील दृश्य पाहून शम्मीजींच्या काळजात चर्रर झालं. नर्गिस खोलीत बसून रडत होती. शम्मीजींना क्षणभर काय करावं काहीच सूचत नव्हतं. कशासाठी आलो होतो आणि काय समोर दिसतंय? याच तंद्रीत असताना नर्गिसची नजर शम्मीजींवर पडली. नर्गिसने त्यांना ओळखलं. डोळे पुसतच विचारलं, 'काय काम आहे?' नर्गिसचे शब्द जणू मधाचा प्रत्येक थेंब वाटावा, अशा अविर्भावात त्यांनी ते कानात साठवून घेतले. आपण कशासाठी आलो आहोत, हे नर्गिसला सांगण्याऐवजी तिच्या रडण्याचं कारण त्यांनी विचारलं. यावर नर्गिस म्हणाली, 'मला तुझ्या भावाच्या सिनेमात काम करायचंय. पण तो नाही म्हणतोय.' राज कपूर आपला मोठा भाऊ असला तरी त्याला त्याच्या कामात कोणाचीच ढवळाढवळ खपत नाही हे शम्मीजींना पुरतं ठाऊक होतं. याही पेक्षा राज कपूरांना वशिल्याची आणि वशिलेबाजांची नफरत आहे, हे तर शम्मीजींना पक्क ठाऊक होतं. काय करावं? काहीच कळत नव्हतं. तेव्हा शम्मीजी स्वत:चा धीर एकवटून आपल्या लाडक्या अभिनेत्री, नर्गिसला म्हणाले, 'मी तुझ्यासाठी प्रार्थना करीन...' शम्मीजींचं हे उत्तर ऐकून नर्गिस अतिशय भावूक झाली. तिने लागलीच शम्मीजींना घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, 'जर मला तुझ्या भावाने त्याच्या 'बरसात' या चित्रपटात घेतलं तर मी तुला एक किस देईन...' नर्गिसचे हे शब्द कानावर पडल्यानंतर शम्मीजी केवळ बेहोष होऊन खाली कोसळायचेच बाकी होते; पण असं होणार नव्हतं. कारण ते नर्गिसच्या मिठीत होते. पुढे नर्गिसला 'बरसात' मिळाला. राज-नर्गिस ही जोडी रुपेरी पडद्यावर हिट झाली! पण नर्गिसने शम्मीजींना दिलेलं वचन पाळलं की नाही याबाबत शम्मीजींनी कधीच कुणाला उघडपणे सांगितलं नाही. ते केवळ एवढंच सांगत, 'नर्गिसने मला किस करण्याचं वचन दिलं होतं...'
नंतर याच 'जंगली' अभिनेत्याने 'किस, किस को प्यार करूँ...' या गाण्यावर ताल धरला!  
  - राकेश शिर्के (सांध्य)