स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील लोकांनी, विशेषत: महाराष्ट्रातील लोकांनी एकत्र येऊन ब्रिटाशांविरोधात लढा उभारावा, या हेतूने लोकमान्य टिळक यांनी दोन उत्सवांना सुरूवात केली. यातील एक उत्सव होता सार्वजनिक गणेशोत्सव आणि दुसरा शिवजंयती. या दोन्ही उत्सवांच्या निमित्ताने लोक एकत्र येतील, ब्रिटीशांविरोधी लढ्याची आखणी करतील आणि इंग्रजांना देशातून हाकलवून देऊन देश स्वतंत्र करतील, असे उद्देश या उत्सवांच्या साजरीकरणामागे होते, असं आपल्याला इयत्ता पाचवीत शिकवलं गेलंय. पण पाचवीतील हा इतिहास कधीच कालबाह्य ठरलाय. म्हणजे, देश स्वतंत्र झालाय म्हणून हा इतिहास कालबाह्य ठरलेला नाहीय; तर गणेशोत्सव आणि शिवजयंती या उत्सवांच्या आजच्या साजरीकरणामुळे तो कालबाह्य ठरलाय. पण हा सारा इतिहास महाराष्ट्रीयनसकट साऱ्यांनाच तोंडपाठ झालाय. आज उत्सवांच्या नावाखाली बाजार मांडला जातोय, या मताचे विरोधक सापडणं कठीणच आहे. खास करून गणेशोत्सवाच्या बाबतीत अर्ध्याहून अधिक लोक या मताशी सहमत आहेत. मग हे सगळं नव्याने सांगण्याची गरज काय? किंवा हेच सांगायचं होतं तर त्यासाठी सिनेमाच्या काही रिळांचा चुराडा करण्याची गरजच काय? हे दोन्ही प्रश्न अतुल कांबळे- अवधूत गुप्ते निर्मित आणि अवधूत गुप्ते दिग्दर्शित "मोरया' हा सिनेमा पाहिल्यानंतर मेंदूत पिंगा घालतात.
खरं तर गणरायाची उंच मूर्ती बनवायची असेल तर त्याचा पाट आधी भक्कम असावा लागतो. किंवा श्रींच्या मूर्तीच्या आकाराप्रमाणे त्याचा पाट तयार करणं क्रमप्राप्त आहे. असं झालं नाही तर मूर्तीचा तोल ढळू शकतो! असंच काहीसं अवधूत गुप्ते कृत "मोरया'चं झालंय. "मोरया'चा पाट म्हणजे त्याची पटकथा. पण सचिन दरेकरने लिहिलेल्या या पटकथेत मोरयाचा हा पाट भक्कमपणे बनवला गेला नाहीय. सिनेमाची कथा साधीसरळ, आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. दोन चाळीतील पोरांची एकमेकांशी असलेली ठसन आणि त्या ठसनमधून गणेशोत्सव साजरा करताना त्यांच्यात लागलेली जीवघेणी स्पर्धा. या स्पर्धेत गणेशोत्सवाचं बाजारीकरण होतंय, हे सांगण्याचा प्रयत्न सचिन दरेकरने केलाय. पण हा प्रयत्न 2011मध्ये करताना आजच्या परिस्थितीचं भान राखणं आवश्यक होतं. किंवा माहित असलेल्या गोष्टीच्या पुढची गोष्ट सांगण्यात खरी गम्मत होती. पण ही गम्मत "मोरया'च्या टिमला करता आली नाही.
अवधूतने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात गिरणगावातील टिपिकल दोन चाळी दाखवण्यात आल्यात. एक म्हणजे खटाव चाळ आणि दुसरी आहे गणेश चाळ... खटाव चाळीतील पोरांचं नेतृत्त्व समीर सय्यद (चिन्मय मांडलेकर) करत असतो तर गणेश चाळीचा भाई मनिष शिंदे (संतोष जूवेकर) असतो. ("मोरया'मुळे पुन्हा एकदा गिरणगावचा पोरगा म्हणून संतोषची जागा पक्की झालीय.) या दोघांमध्ये ठसन असते. ही ठसन सिनेमाच्या पहिल्याच फ्रेमपासून दिसायला लागते. जेव्हा मन्या आणि त्याची पोरं दहीहंडीच्या थरांचा सराव करत असतात. समीर मन्याच्या गोंविदात सामील होणाऱ्या दुसऱ्या चाळीच्या पोरांना फोडतो आणि स्वत:च्या गोविंदा पथकात सामील करून घेतो. मन्या त्या गद्दारी केलेल्यांपैकी दोन पोरांना उचलून आणतो आणि फोडून काढतो. तेव्हा समीर मन्याच्या गच्चीत येऊन मन्यालाच त्याच्या पोरांसमक्ष कोयत्याच्या जोरावर हग्या दम देतो आणि त्या दोन पोरांना सोडवून निघून जातो. या दृश्यात चिन्मयनची इंट्री आहे. जी अतिशय भन्नाट आहे. मग दहीहंडीचा दिवस उजाडतो. दोन्ही गोविंदा पथकं दहा थरांची हंडी फोडायला निघतात. अर्थातच सिनेमाचं संगीत अवधूत गुप्तेचं आहे तर मग हंडीचं एक सॉलिड गाणं सिनेमात असंण स्वाभाविकच आहे. परवा साजरा होणाऱ्या दहिकाल्यात "मोरया'चं हे गाणं हमखास वाजवलं जाणार. कारण ते गाणं मस्तच आहे आणि खास करून ते तोंडावर आलेल्या दहीहंडीसाठीच खास बनवलं गेलंय. पुढे, त्या दहा थराच्या हंडीचं काय होतं ते मात्र कळत नाहीय. कारण ती हंडीच सिनेमात कुठे दिसत नाही. पण तरीही मन्या आणि समीरमध्ये हंडी कोण फोडणार यावरून समुद्र किनाऱ्यावर मारामारी होते. पोलीस येतात आणि दोघांनाही पकडून नेतात. तेव्हा दोन्ही चाळींच्यामध्ये कामत खाणावळ चालवणारे कामत काका (दिलीप प्रभावळकर) हातात रुद्राक्षाची माळ घालून पोलीस ठाण्यात येतात आणि दोघांची जामीनावर सुटका करतात. कामत काकांनी अपेक्षेप्रमाणे उत्तम काम केलंय. पण दिग्दर्शकाला त्यांचा योग्य वापर करून घेता आलेला नाहीय. तर, दोघंही आपापल्या चाळीत परतात. तेव्हा त्यांना कळतं चाळ पाडून टॉवर बांधण्यासाठी चाळकऱ्यांनी बिल्डरला परवानगी दिलीय. पण दोन्ही चाळी एकत्र करून एकच कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. म्हणून मग कोणत्या तरी एका चाळीचा यंदाचा शेवटाचा गणेशोत्सव असणार आहे. आता हा शेवटचा गणेशोत्सव कोणाचा? गणेश चाळीचा की खटाव चाळीचा? हे ठरवणं कामत काकांनाही मुश्किल होतं. समीर आणि मन्या माघार घेण्याचा प्रश्नच नसतो. म्हणून मग यंदा ज्यांचा गणेशोत्सव मोठा तेच मंडळ पुढल्या वर्षीही गणेशोत्सव साजरा करेल, असा सुवर्णमध्य काढला जातो. आणि मग सुरू होतो आपलाच गणेशोत्सव मोठा आहे हे सिद्ध करण्याचा खेळ...
समीर मुसलमान असूनही गणेशोत्सव साजरा करत असतो. पण या मागे त्याची गणेशभक्ती प्रामाणिक असते. म्हणून मग तो एका मुस्लीम ट्रॅव्हल कंपनीच्या मालकाची भली मोठी वर्गणी स्वीकारतो. तेही इच्छा आणि तत्त्वात बसत नसतानाही. कारण मोठा गणेशोत्सव साजरा करायचा तर पैसा लागणारच. अशीच परिस्थिती गणेश चाळीच्या पोरांचीही असते. मन्या एका स्थानिक आमदाराकडून तगडी वर्गणी मिळतो. मग दोन्ही गणेश मंडपं सजू लागतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही गणपती बाप्पा दोन्ही मंडपात विराजमान होतात. पण काय केलं तर आपल्या मंडळाच्या गणपतीलाही "लालबागचा राजा'सारखी प्रसिद्धी मिळेल, असा प्रश्न समीर आणि मन्याच्या मेंदूत घुमू लागतो. गणेश मंडळाला प्रसिद्धी मिळवण्यासाठी मग समीर-मन्यामध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू होते. समीर मुस्लीम असल्याचा फायदा घेत आपला गणपती सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारा गणपती आहे, असं चॅनेलवाल्यांना कळतो. तेही तडक मंडपात पोचतात आणि ब्रेकिंग न्यूज देऊन टाकतात. असंच काहीसं मन्याही करतो. तो चाळीतील लग्नाच्या सात वर्षांनंतर घरात पाळणा हलणाऱ्या दाम्पत्याला गणेश चाळीच्या गणरायाला नवस केल्यामुळेच पाळणा हलला असं चॅनेलवाल्यांना सांगण्यास भाग पाडतो आणि प्रसिद्धी मिळवतो. नंतर मात्र ही स्पर्धा वेगळ्याच वळणावर जाते. दोन्ही मंडळांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन स्थानिक राजकारणी शहरात जातीय दंगे भडकवतात. खूप शाब्दीक खूनखराबा होतो. पार मुंबईत कर्फ्यू लागण्यापर्यंत या दोन चाळींच्या गणेश मंडळातील मॅटर पोचतं. हे दंगे शमवण्यासाठी गणेश यादवला इन्स्पेक्टर बनवण्यात आलंय. गणेशने भन्नाट पोलीसवाला उभा केलाय. पण तो एकटाच पोलीस खात्यात असल्याचं राहून राहून वाटतं. कारण शहरात कर्फ्यू लागलेला असतानाही पडद्यावर केवळ गणेश आणि त्याच्या पोलीस व्हॅनमध्ये सामावतील इतकेच पोलीस दिसतात.
"मोरया'ची कथा-पटकथा अजिबात नवीन नाहीय. त्यामुळे तोच तोच विषय पडद्यावर पहावा लागतोय. म्हणजे उत्सवांसाठी वर्गणी मागितली जाते की खंडणी, आपल्याच गणेश मंडळाला प्रसिद्धी मिळाली पाहीजे, मग त्यासाठी वाट्टेल ते करू, गणेशोत्सवात मनोरंजनाच्या नावाखाली बाया नाचवणं, मंडळाच्या मागच्या बाजूचं दारूच्या आणि जुगाराच्या अड्ड्यात रुपांतर होणं, पैसे देऊन सेलिबे्रटी बोलावणं आणि त्यांच्या नावावर प्रसिद्धी मिळवणं हे आणि असे अनेक विषय "मोरया'त आहेत. ज्यातील एकही विषय किंवा मुद्दा नवीन नाहीय. सिनेमात स्पृहा जोशी आणि परी तेलंग यांनाही घेण्यात आलंय. यात स्पृहा मन्याची गर्लफ्रेंड असते. पण ती बारमध्ये सिंगर म्हणून काम करत असते. अवधूतने स्पृहाचं बारसिंगर म्हणून काम करण्याचं जे कारण सांगितलंय ते भन्नाट आहे. बारमध्ये गाणी गायल्यामुळे तिची गाणी सेट होतात, तिला स्टेज प्रेझेन्स समजतो, लोकांपुढे तिला गाणं सादर करण्याची संधी मिळते वगैरे वगैरे कारणं स्पृहाच्या बारमध्ये गाणं गाण्याच्या मागे आहेत. ही कारणं एवढ्यासाठीच भन्नाट आहेत की, अशी कारणं आजवर कोणीच सांगितलेली नाहीत. हीच गत परी तेलंगची झालीय. ती एका टीव्ही चॅनेलची पत्रकार असते. ब्रेक्रिंग न्यूजच्या नादात ती समीरच्या प्रेमात पडते. पण ती प्रेमात पडलीय हे आपल्याला परी चिन्मयाचा हात पकडते असं एकच दृश्य सिनेमात आहे त्यातून समजून घ्यावं लागतं. तेही तिने हात पकडल्यावर चिन्मय तिच्याकडे एका विशिष्ट नजरेने पाहतो म्हणून आपल्याला ते समजतं. बाकी सिनेमात धनश्री कोरेगावकर, पुष्कर श्रोत्री, विमल म्हात्रे, मेघना एरंडे, सुनील रानडे, सुनील गोडसे आदी कलाकारांनीही चोख कामगिरी बजावलीय. सिनेमाची गाणी गुरू ठाकूर, संदीप खरे, अरविंद जगताप, अवधूत गुप्ते यांनी लिहिलीत. सिनेमात अवधूत आणि सुबोध भावेवर चित्रीत केलेली एक कव्वाली आहे. या कव्वालीसाठी अवधूतचं करावं तितकं कौतुक थोडंच आहे. कारण गणपतीवर कव्वाली ही कल्पनाच भन्नाट आहे. यातही कव्वालीतून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असणाऱ्या गणरायाला "मौला मेरे मौला' म्हणणं हे खरोखरच महाराष्ट्रात धाडसाचंच काम आहे. अवधूतने हे यशस्वी धाडस केलंय. कव्वालीही मस्त आहे. ती कव्वाली यंदाच्या गणेशोत्सवात वाजवली जातेय की नाही हे पहाणं उत्सूकतेचं ठरेल.
गणेशाची मूर्ती जितकी उंच तितका मूर्तीचा पाट मजबूत, या नियमाप्रमाणे जर "मोरया"च्या पटकथेला मजबूत करण्यात आलं असतं तर खरोखरच एक उत्तम सिनेमा तयार झाला असता. अफसोस, इयत्ता पाचवीतील इतिहास सांगण्याच्या नादात हा बिनपाटाचाच "मोरया' तयार करण्यात आला.
- राकेश शिर्के (सांध्य)
No comments:
Post a Comment