Tuesday, 23 August 2011

बाबरी विध्वंसाचीच ही फळं?

जुलै महिन्याच्या तेरा तारखेला मुंबई पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरली. संध्याकाळी जेव्हा हे बॉम्ब फुटले तेव्हा मी कार्यालयातच होतो. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर हे बॉम्बस्फोट झाले होते. अवघी मुंबई कळवळली  असताना माझे सहकारी स्फोटांनंतरही कार्यालयातून बाहेर पडण्यास उत्सुक नव्हते. हे चित्र बॉम्बस्फोटांच्या छायाचित्रांपेक्षा विदारक होते. अखेर माझ्या अखत्यारीत नसतानाही मी कार्यालयातून थेट घटनास्थळी पोचलो. रात्रभर तीन ठिकाणी झालेल्या स्फोटांची माहिती गोळा केली. पण हाती केवळ मृतांची नावं आणि जखमींची यादीच लागली होती. बॉम्बस्फोटाचं नेमकं कारण काही केल्या सापडत नव्हतं. म्हणून मग मेंदूवर अधिक ताण पडला तरी हरकत नाही, असं म्हणालो आणि मुंबईच्या बॉम्बस्फोटांच्या मूळाशी जाऊन पोचलो. या प्रवासात किंवा या प्रवासामुळे जे हाती लागलं तेच इथे लिहितोय.... खरं तर हा लेख मी बॉम्बस्फोटांच्या नंतर आलेल्या "आपलं महानगर'च्या रविवार आवृत्तीत प्रसिद्ध केलाय. तेव्हा माझ्या सहकार्यांसह अन्यही काही जण माझ्यावर नाराज झाले होते...

"या देशाला दहशतवादाने विळखा घातलाय,' हे वाक्य वापरून वापरून इतकं गुळगुळीत झालंय की ते लिहिण्याचीही आता लाज वाटू लागलीय. "अजून किती निष्पाप जीवांचे बळी घेणार,' असा सवाल पुसण्यातही आता काही तथ्य उरलेलं नाहीय. "देशाची सुरक्षा यंत्रणा कमकुवत आहे,' असं सांगण्याचीही आता गरज नाहीय. अशा परिस्थितीत दहशतवादावरील लिखाण करणं महाकठीण काम बनलंय. देशाचा एकही कोपरा सुरक्षित नाहीय, हे 7/13च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांनी सिद्ध करून दिलंय. 7/11च्या बॉम्बस्फोटाची 5 वर्षं पूर्ण झाल्याचं दु:ख व्यक्त करून पुर्वपदावर येत असतानाच 7/13चे बॉम्बस्फोट घडले. खरं तर मुंबईसह देशात बॉम्बस्फोट घडणं ही इतकी सततची घटना झालीय की अशा घटनांवर व्यक्त होण्यासाठीही इथला नागरिक आता कंटाळा करू लागलाय. या कंटाळ्याला आपण त्यांच्या सहनशक्ती अंत झालाय, असंही म्हणू शकतो. आज मुंबईत तर उद्या पुण्यात, परवा हैदराबादेत तर तेरवा बनारसमध्ये... बॉम्बस्फोटांचं सत्र सुरूच आहे. यातही जेव्हा जेव्हा मुंबईत बॉम्बस्फोट होतात तेव्हा तेव्हा जगभरातून "मुंबईकरांचं स्पिरीट' नावाचं मीठ मुंबईकरांच्या जखमांवर चोळलं जातं. या पूर्वी हे मीठ असरदार साबीत होत होतं. मात्र कालच्या, 7/13च्या बॉम्बस्फोटांनी या मीठालाही बेअसर करून टाकलं. मुंबईकरांनी हे "मुंबईकरांचं स्पिरीट' नावाचं मीठ निकालात काढलं. "स्पिरीट वगैरे काही नाही, हा आमचा नाइलाज आहे,' अशी खारट प्रतिक्रिया अगदी उघडपणे मुंबईकरांनी नोंदवली. या प्रतिक्रियेने इथल्या निगरगट्ट राजकारण्यांना मात्र पुरतं हादरवलं. खरं तर मुंबईकरांनी या नेत्यांना हा दणका यापूर्वीच द्यायला हवा होता. असो... "देर आये, दुरूस्त आये...'

तर कालच्या या 7/13च्या बॉम्बस्फोटांमुळे एक प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय. तसा हा प्रश्न जुनाच आहे. मधल्या काळात तो प्रश्न सोयीने विसरायला लावण्यात आला होता. पण इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते ! ती 7/13च्या बॉम्बस्फोटांमुळे झाली. या साखळी बॉम्बस्फोटांनंतर देशाची सर्वोच्च तपास यंत्रणा कामाला लागलीय. तपासात अनेक नवीन मुद्दे समोर येऊ लागलेत. संशयाच्या सूया ताशी 180 किलोमीटरच्या वेगाने फिरू लागल्यात. ही सूई कधी इंडियन मुझाहिद्दीन नावाच्या अतिरेकी संघटनेवर जाऊन थांबतेय, तर कधी आंतरराष्ट्रीय अतिरेकी म्हणून घोषित झालेल्या दाऊद इब्राहिम नावाच्या अंडरवर्ल्ड डॉनवर जाऊन उभी राहतेय. शासन, प्रशासनाने तपासात कोणतीही तडजोड करणार नाही, सर्व शक्यता तपासून पाहिल्या जातील अशी हमी दिलीय. कोणाला हमी दिलीय ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. (कदाचित स्वत:लाच दिलेली असावी.) पण तरी सुद्धा एक मुद्दा तसाच अनुत्तरीत राहतो. तो म्हणजे, हे बॉम्बस्फोट सातत्याने का होतात? या देशाने, यातही या मुंबईने कोणाचं काय घोडं मारलंय? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं इतिहासात नक्की सापडतील. जर आपण तो इतिहासही पुन्हा तपासून पाहणार असू तरच... देशात बॉम्बस्फोटांची मालिका सुरू होण्याचं एक कारण बाबरी मशिदीच्या विध्वंसात दडलंय, असा एक प्रश्न निर्माण झालाय. याच प्रश्नाच्या अनुषंगाने मुंबईकरांना तसंच समस्त भारतीयांना एक थेट प्रश्न विचारला गेला होता. बाबरी मशिद पाडल्यापासूनच देशात बॉम्बस्फोट होऊ लागलेत का? तुम्हाला काय वाटतं? असा तो प्रश्न होता. अर्थातच हा प्रश्न "फेसबुक' या सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून विचारण्यात आला होता. या प्रश्नावर लोकांकडून आलेल्या प्रतिक्रिया पुढे येतीलच, पण काहींनी या प्रश्नावर प्रतिक्रिया न देण्यासाठी जे प्रकार अवलंबले ते कुतुहल निर्माण करणारे होते. काहींनी फेसबुक ही सोशल नेटवर्किंग साइट आहे. यामुळे इथे प्रतिक्रिया देणं उचित नाही, असं मोबाइलवर मेसेज पाठवून कळवलं. काहींनी याच मोबाइल मेसेज सेवेचा उपयोग करून प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी मौन धारण करून आपली प्रतिक्रिया कळवली. एका बड्या नेत्यालाही या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यासाठी गळ घालण्यात आली होती. मात्र त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं, कळून न कळल्यासारखं आणि पाहून न पाहिल्यासारखं केलं...

बॉम्बस्फोट का होतात हे जाणून घेण्याच्या हेतूने विचारण्या आलेल्या बाबरी मशिद पाडल्यापासूनच देशात बॉम्बस्फोट होऊ लागलेत का? तुम्हाला काय वाटतं? या प्रश्नावर प्रतिक्रिया दिलेल्यांमधील पहिली प्रतिक्रिया स्वयंसेवी संस्थेत कार्यरत असणाऱ्या अजित अभिमेषी नावाच्या तरुणाची होती. तो म्हणतो, "मुंबईत नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटाचा निषेध करायलाच हवा. 12 मार्च 1993पासून सुरू झालेला हा बॉम्बब्लास्ट"चा सिलसिला थांबायचं नाव घेत नाही. बाबरी मशीद पाडल्यानंतर हजारो लोकांचे बळी गेले. त्यातूनच 12 मार्च 1993 घडलं आणि आता गेल्या काही वर्षांपासून आपण गुजरातच्या दंगलीची फळं भोगतोय. जर देशात दंगली झाल्या नाहीत तर असे ब्लास्ट होणार नाहीत. कारण क्रिया घडल्यानंतर प्रतिक्रिया ही उमटतेच. म्हणून जातीय दंगली होणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे. तसंच दंगल घडवणाऱ्याला कडक शासन झालं पाहिजे. त्याच बरोबर बॉम्ब ब्लास्ट करून निरपराध लोकांचे बळी घेतात त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. कारण न्याय मागण्याचा हा मार्ग चुकीचा आहे. तर दयानंद महर्षी महाविद्यालयात (एम. डी. कॉलेज) शिक्षिका असलेल्या पोर्णिमा जाधव-कोल्हे म्हणातात की, बाबरी मशीद हा इश्यू म्हणजे "माकडाच्या हातात कोलीत दिलेले होते.' अशा देशविरोधी कारवाया याही आधी होत होत्याच. बाबरी इश्यूनंतर तर बेटर रिजन मिळाले. 1970साली भिवंडीला झालेली जातीय दंगल... त्याची प्रतिक्रिया म्हणून बॉम्बस्फोट का नाही झाले त्या काळी? कारण त्या वेळी 2नंबरच्या धंद्यात हिंदू-मुसलमान युनिटी होती. त्यांनीच तर हा देश मोठ्या प्रमाणावर पोखरायला सुरूवात केली. फक्त ते स्लो पॉयझनिंग होतं. पुढे अंमल पदार्थांच्या तस्करीत आणि सगळ्याच 2नंबरच्या धंद्यात छोटा राजन, अमर आणि अश्विन नाईक आणि पूर्वी हाजी मस्तान, करीम लाला नंतर दाऊद आणि गॅंग या वेगवेगळ्या झाल्या. बाबरी इश्यू झाला नसता तर वेगळे कारण शोधून ब्लास्ट केले गेले असते. वैयक्तिक सूड भावनेला आता धर्माचा स्ट्रॉंग बेस मिळालाय. (खरं तर असं म्हणणं अधिक चांगलं राहिल की, या देशात राहणारे पण मनाने कदाचित एकनिष्ठ नसलेल्या लोकांचा उद्रेक बाबरी इश्यूमुळे बाहेर आला.) 1970नंतरही दाऊद अँड कंपनी भारतात होती आणि 1992 नंतरही.... मग प्रतिक्रियेमध्ये एवढा मोठा फरक का? यानंतर पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्राचा अभ्यास पूर्ण केलेल्या वाल्मिकी गायकवाड या तरूणाने आपली प्रतिक्रिया कळवलीय. त्याच्या मते, विचारण्यात आलेला प्रश्न शंभर टक्के योग्य आहे. बाबरी मशीद पाडली आणि शासनकर्त्यांनी जनमताचे राजकारण करताना आम्ही किती मुस्लीम द्वेष्टे आहोत हे दाखवण्यासाठी "अब्दुल पाकिर जब्नुआल कलाम' यांना राष्ट्रपती केलं. शासनकर्त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. हिंदू आणि मुस्लीम अशी तेढ वाढतच गेली. नंतरच्या काळात मुंबईतले स्फोट आणि गोध्रा हत्याकांडाचे पडसाद उमटत राहिले तरी याचे मूळ कारण बाबरी मशिदच आहे हे तार्किक दृष्ट्या सिद्ध होते. धार्मिक भावना दुखावण्याचे हे सगळे पडसाद आहेत, असं म्हणालो तर वावगं ठरणार नाही. खरं तर दहशतवादाचे निर्माते दुसरे तिसरे कुणी नसून राजकारणी वर्गच असतो. दहशतवादाला पूर्णविराम द्यायचा असेल तर एकमेकांच्या धार्मिकतेविषयी, भावनांविषयी आदर आणि सन्मान ठेवणं गरजेचं आहे. "शस्त्राने कधीच क्रांती होऊ शकत नाही, तसंच शस्त्राने प्रतिक्रांतीही होऊ शकत नाही,' हे जागतिक सत्य आहे. नवी मुंबईत वास्तव्यास असलेला आणि सिने जगतात कार्यरत असलेल्या बिपीन कांबळे याने, "बाबरी हे एक कारण असू शकेल. पण बाबरी पाडली नसती तरी बॉम्बस्फोट झालेच असते,' अशी "मार्मिक' प्रतिक्रिया नोंदवलीय.

यानंतर आलेली प्रतिक्रिया ही देशाबाहेरील आहे. नोकरीच्या निमित्ताने आबुधाबी या देशात काम करत असलेल्या किशोर पवार या तरूणाने विचारण्यात आलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण केलाय. तो लिहितो, "बाबरीमध्ये रामलल्ला कि अल्ला?' या एका प्रश्नाने आता पर्यंत हजारो निरपराध, निष्पाप जीवांचे बळी घेतलेत. अजून त्या रामलल्ला कि अल्ला ला किती रक्तपात पहायचाय कोणास ठाऊक? किशोरने या त्याच्या संतापानंतर प्रदिर्घ प्रतिक्रिया लिहिलीय. त्याच्या मतेही विचारण्यात आलेला प्रश्न योग्यच आहे. तो म्हणतो, "होय बाबरीनंतरच...' पुढे किशोर असंही म्हणतो की, मुंबई आणि महाराष्ट्रात 93च्या पूर्वीही असे धार्मिक तणाव किंवा दंगली झाल्यात. पण त्यात अशी किड्या-मुंग्यांप्रमाणे माणसं मारली गेली नाहीत. कुठे शिवजयंतीच्या मिरवणुकीत तणाव तर कुठे संदलमध्ये... केवळ दोन गटातला तणाव... पण बाबरी पाडली आणि या भयाण सूड चक्राला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. मुंबईत दंगल आणि त्यानंतर बॉम्बस्फोटांची मालिका... तिकडे गोध्रा जाळले, इकडे पुन्हा बॉम्बस्फोट... मालेगाव कधी पुणे... कुणाचा हिरवा दहशतवाद तर कुणाचा भगवा... हेतू एकच बेसावध माणसं मारणं... हे ओरिसामध्ये स्टेनसकट त्यांच्या मुलांना जाळून मारतात, कधी मालेगावला बॉम्ब फोडतात. आणि ते पाकिस्तान किंवा बांगलादेशातून माणसं आणून त्यांच्या साथीने धमाके करून निघून जातात. यात राम मेला की रहिम? काही देणं घेणं नाही... यांचा प्रखर राष्ट्रवाद तर त्यांचा इस्लामसाठी जिहाद... आखाती देशात नोकरीसाठी गेलेल्या किशोरच्या प्रतिक्रियेनतंर मराठी मालिकांसाठी संवाद लेखन करणारा, नाटककार, पटकथाकार स्वप्निल गांगुर्डे या तरूण लेखकाने आपली प्रतिक्रिया नोंदवलीय. तो म्हणतो, "दहशतवादाला चेहराही नाही आणि मेंदूही नाही.... बॉम्बस्फोट घडवण्यासाठी निमित्त कशाला हवंय? बाबरीचा इतिहास तर साऱ्यांना ठाऊक आहे. ते जर कारण असतं तर केवळ मुंबई टार्गेट केली गेली नसती. आपलं शासन षंढ आहे हे वारंवार सिद्ध करण्याचाच हा प्रयत्न आहे. भारतमातेने हातात बांगड्या भरलेल्या आहेत, याची जाणीव करून दिली जातेय. आपण त्यांची दोन (कसाब आणि अफजल गुरू) माणसं मारू शकत नाही. पण ते आपली शेकडो माणसं मारण्याची ताकद ठेवतात, यातच सारं काही आलं...'

बाबरी मशिद पाडल्यापासूनच देशात बॉम्बस्फोट होऊ लागलेत का? तुम्हाला काय वाटतं? या प्रश्नांवर आलेल्या या प्रातिनिधीक प्रतिक्रियांवरून निष्कर्ष काढणं कदाचित घाईचं ठरेल. पण या शक्यतेकडे कानाडोळा करून चालणार नाही. तसं झालं तर पुन्हा एकदा राजकारण्यांना "मुंबईकरांचं स्पिरीट' नावाचं ते जालिम मीठ चोळण्याची संधी मिळेल...!
                                                                                                                              
                                                                                                                           - राकेश शिर्के  (सांध्य)

No comments:

Post a Comment